विज्ञानाची कास धरूनच कलामांचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार
By Admin | Published: August 9, 2015 01:26 AM2015-08-09T01:26:44+5:302015-08-09T01:26:44+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न बघितले होते.
खासदारांचे प्रतिपादन : गडचिरोलीत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन
गडचिरोली : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला विज्ञानाची कास धरून प्रत्येक क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
स्थानिक शिवाजी कला महाविद्यालयात इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जि.प. सीईओ संपदा मेहता, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, प्रशांत वाघरे, प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, निरंतर शिक्षणाधिकारी निलेश पाटील, चामोर्शी पं.स.च्या सभापती शशीकला चिळंगे, प्राचार्य एम. जे. मेश्राम, भारत खटी, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. यावेळी आ. गजबे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण करण्याचे आवाहन केले. डॉ. देवराव होळी यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी आत्राम, संचालन राकेश चडगुलवार तर आभार निलेश पाटील यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)