गाढवी नदीत इटियाडोह धरणाचे पाणी सोडले
By admin | Published: May 30, 2016 01:27 AM2016-05-30T01:27:21+5:302016-05-30T01:27:21+5:30
गाढवी नदीवर आरमोरी तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाण्याअभावी या योजना अडचणीत आल्या होत्या.
आमदारांचा पाठपुरावा : नळ योजना व जनावरांसाठी लाभदायक
आरमोरी : गाढवी नदीवर आरमोरी तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाण्याअभावी या योजना अडचणीत आल्या होत्या. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी इटियाडोह धरण प्रशासनाकडे गाढवी नदीत इटियाडोहाचे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे.
आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली. त्यामुळे मार्च महिन्यातच नदी, नाले कोरडे पडले होते. नदीपात्रातील पाणी संपल्याने पात्रात असलेल्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या होत्या. गावात पाणीटंचाई असल्याने जनावरांना पाणी मिळत नव्हते. अशा स्थितीत नदीही आटल्याने जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आरमोरी तालुक्यातील ही भीषण परिस्थिती लक्षात घेऊन इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याबरोबरच जवळपासच्या नदी, नाल्यांमध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी आमदार क्रिष्णा गजबे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदारांनी पाठपुरावा करीत इटियाडोह धरणाचे पाणी गाढवी नदीत व इतर नाल्यांमध्ये सोडायला लावले. त्यामुळे ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत नदीपात्रात पाणी चालूच ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)