जहाल माओवादी मन्याची अखेर पोलिसांपुढे शरणागती; आठ खुनांसह ३४ गुन्हे: सहा लाखांचे होते बक्षीस
By संजय तिपाले | Published: August 30, 2024 09:58 PM2024-08-30T21:58:38+5:302024-08-30T21:58:51+5:30
गडचिरोली: सदस्य ते एरिया कमिटी सदस्य अशी मजल मारणारा व दहशतीच्या जोरावर आठ खुनांसह तब्बल ३४ गुन्हे करणारा जहाल ...
गडचिरोली: सदस्य ते एरिया कमिटी सदस्य अशी मजल मारणारा व दहशतीच्या जोरावर आठ खुनांसह तब्बल ३४ गुन्हे करणारा जहाल माओवादी केदार उर्फ मन्या किंजो नैताम(वय ४२ , रा. कोसमी क्र. -१ ता. धानोरा) याने अखेर ३० ऑगस्टला पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्याच्या नावावर ६ लाखांचे बक्षीस होते.
केदार उर्फ मन्या नैताम हा २००२ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. २००७ ते २०१२ दरम्यान
दक्षिण गडचिरोली डिव्हीजन मध्ये तांत्रिक टीममध्ये त्याने काम केले. २०१२ ते २०२० या दरम्यान तो टिपागड एरिया प्लाटून १५ मध्ये सक्रिय होता.
२०२० मध्ये त्याची एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली होती.तेव्हापासून तो दक्षिण सब झोनल ब्युरोमध्ये तांत्रिक टीममध्ये सक्रिय होता. मात्र, त्याने आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
त्याला शासनाकडून पुनर्वसन योजनेद्वारे साडेचार लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
.....
आतापर्यंत २५ जणांचे आत्मसमर्पण
माओवादविरोधी अभियान प्रभावीरीत्या राबविल्यामुळे २०२२ ते २०२४ या कालावधीत एकूण २५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यासाठी नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा , पोलिस अधीक्षक नीलोत्पल,
यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम सुरु आहे.
....
अशी आहे गुन्हे कारकीर्द
केदार उर्फ मन्या नैतामवर ३४ गुन्हे नोंद आहेत. यात चकमक १८ ,२ जाळपोळ, ८ निरपराध व्यक्तींचे खून या गुन्ह्यांचा समावेश आहे.
२००४ मधील मानेवारा, बंदूर, २०१४ मध्ये बोटेझरी , २०१६ मध्ये दराची, २०१९ मध्ये गांगीन, २०२० मध्ये किसनेली, २०२१ मध्ये कोडूर जंगलातील चकमकीत त्याचा सक्रिय सहभाग होता.
....
विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलिस दलाच्या कारवाया सुरु आहेत. माओवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पोलिस दल सर्वतोपरी मदत करत आहे. त्यामुळे माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली