जिमलगट्टा व गुरनोलीत दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:53 AM2018-10-08T00:53:26+5:302018-10-08T00:53:48+5:30
कुरखेडा तालुक्यातील गुरनोली व अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे दारू जप्त करण्यात आली आहे. गुरनोली गावातील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती गावातील महिला मंडळाला प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा/जिमलगट्टा : कुरखेडा तालुक्यातील गुरनोली व अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे दारू जप्त करण्यात आली आहे.
गुरनोली गावातील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती गावातील महिला मंडळाला प्राप्त झाली. गावातील सरपंचासह महिलांनी रविवारी सकाळी ९ वाजता सुमारास धाड टाकून मोहफुलाचा सडवा, दारू तसेच दारू निर्मितीचे साहित्य जप्त केले. महिला कारवाई करण्यासाठी येत असल्याची कुणकुण लागताच दारू काढणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गुरनोली गावात दारूबंदीचा निर्णय झाला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी दारूबंदी समितीचे सुध्दा गठण करण्यात आले आहे. तरीही दारू विक्रेत्यांनी गावकऱ्यांना न जुमानता दारू काढणे व विक्री सुरूच ठेवली होती. त्यांना अद्दल घडविण्यासाठी महिलांनी कारवाई केली. सदर कारवाई दारूबंदी समितीच्या प्रमिला कोडवते, नंदिनी उसेंडी, सुनिता उसेंडी, रंभा मरस्कोल्हे, शीतल भैसारे, मनिषा किरंगे, उर्मिला धुर्वे, मुक्ता पुराम, उत्तरा कांबळे, शिशु सयाम, वनिता उसेंडी, हेमलता टेंभुर्णे, मिना नैताम, सरपंच लहुजी किरंगे व गावकरी उपस्थित होते. जप्त केलेला सडवा नष्ट करण्यात आला.
तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या टेकडा गावातून अहेरीकडे अवैधरित्या ३३ पेट्या दारू नेली जात होती. यामध्ये १ हजार ५८४ बॉटल आढळून आल्या. एमएच ३३ टी ०८०३ क्रमांकाची बोलेरो वाहन जप्त करण्यात आले.
दारू व वाहनाची किंमत ६ लाख ५३ हजार रूपये एवढी होते. राजू बानय्या भोडेवार, महेश रामचंद्र दुर्गे दोघेही रा. रायगट्टा, कुमरी श्रीनिवास रा. अलगामा (तेलंगणा राज्य) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.