जांभळी गावाची समितीकडून तपासणी
By admin | Published: May 18, 2017 01:47 AM2017-05-18T01:47:29+5:302017-05-18T01:47:29+5:30
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय चमूने तालुक्यातील जांभळी गावाची १६ मे रोजी तपासणी केली आहे.
गावातील स्वच्छतेचे कौतुक : ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय चमूने तालुक्यातील जांभळी गावाची १६ मे रोजी तपासणी केली आहे.
मार्च महिन्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन गावाची तपासणी केली. जिल्हा स्तरावरून जांभळी गावाला पात्र ठरविण्यात आले. वर्धा येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राच्या विभागीय तपासणी पथकाने १६ मे रोजी गावाला भेट दिली. भेटीदरम्यान गावातील शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी, कंपोस्ट खत, गांडुळ खत, गोबरगॅस संयंत्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासली. गृहभेटी देऊन कुटुंबाकडून माहिती जाणली.
यावेळी समितीचे अध्यक्ष रधाकाटे, लालसिंग ठाकूर, वानखेडे, जुवारे, गेडाम, अवसरे, सरपंच रत्नमाला बावणे, उपसरपंच लोहट, अभियान अध्यक्ष मडावी, ग्राम विकास अधिकारी के. के. कुलसंगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
जांभळी गावाने आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. गावातील स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजनबध्द व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत नागरिकांचा असलेला सकारात्मक दृष्टीकोन, एकमेकांच्या अडचणीत धावून जाण्याची वृत्ती आदी बाबीची समितीचे अध्यक्ष व इतर सदस्यांनी कौतुक केले आहे. सदर गाव इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.