गडचिरोली जिल्ह्यातील काेरचीचे जांभूळ थेट नागपूरच्या बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 02:15 PM2021-06-11T14:15:32+5:302021-06-11T14:15:54+5:30

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने काेरची तालुक्यातील जांभळाची थेट विक्री नागपूर येथील बाजारपेठेत करण्यास प्रारंभ झाला आहे.

The jamun of Karachi is directly in the market of Nagpur | गडचिरोली जिल्ह्यातील काेरचीचे जांभूळ थेट नागपूरच्या बाजारपेठेत

गडचिरोली जिल्ह्यातील काेरचीचे जांभूळ थेट नागपूरच्या बाजारपेठेत

googlenewsNext

पालकमंत्र्यांनी घेतला पुढाकार, दुप्पट भाव

गडचिरोली : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने काेरची तालुक्यातील जांभळाची थेट विक्री नागपूर येथील बाजारपेठेत करण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे जांभळाला दुप्पट किंमत मिळण्यास मदत झाली आहे. पालकमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जांभूळ विक्रीला नागपुरात प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व इतर मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. कोरची येथील जांभळाला उत्तम दर प्राप्त व्हावा आणि हातावर पोट असलेला आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सबळ आणि सक्षम बनावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे कसोशीने प्रयत्न करत होते. त्यांच्या संकल्पनेतून कोरचीतील जांभूळ विक्री नागपूरसारख्या महानगरात करण्याचा विचार पुढे आला. आतापर्यंत व्यापारी १० ते १५ रुपये किलो दराने जांभळाची खरेदी उत्पादक शेतकऱ्यांकडून करत होते. मात्र, आता महिला बचत गटांच्या माध्यमातून याच जांभळाची खरेदी २५ रुपये किलो दराने केली जाणार आहे. त्यामुळे उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. या सर्वांत महिला बचत गटांनी दाखविलेला पुढाकार प्रशंसनीय ठरला आहे.

कोरची तालुक्यातील जांभळाची विक्री सध्या चंद्रपूर, नागपूर, देसाईगंज, ब्रम्हपुरी, छत्तीसगड राज्यातील रायपूर, राजनांदगाव, भिलाई, दुर्ग येथील व्यापारी करत होते. त्यात व्यापारी वर्गाचा पुरेपूर आर्थिक लाभ होत होता. परंतु, स्वतः कष्ट करून जांभळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र या जांभूळ विक्रीचा पुरेसा मोबदला मिळत नव्हता.

त्यामुळे अशा उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी केला व आज तो निर्धार पूर्णत्वास नेला.

जांभळात असलेले गुण

मधुमेह, अस्थमा, हृदयरोग, पोटाचे आजार, कर्करोग यासारख्या विविध आजारांवर जांभूळ गुणकारी आहे. जांभळामध्ये ग्लुकोज व फुक्टोज, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडिअम, विटॅमीन सी, थायमीन, रायबोफ्लेवीन, नियासीन, विटॅमीन बी ६, फॉलिक ॲसिड, प्रोटिन व कॅरोटीन यासारखे घटक असल्याने त्याचा बहुविध कारणांसाठी वापर केला जातो.

जंगलातील जांभूळ गोळा करण्यापासून ते जांभळाचे मूल्यवर्धन करून बाजारात विकेपर्यंतच्या प्रक्रियेत समावेश असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येऊन मोठ्या बाजारपेठांमध्ये जांभूळ विक्री महोत्सवाचे आयोजन केल्यास या व्यवसायला गती मिळेल.

Web Title: The jamun of Karachi is directly in the market of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fruitsफळे