सासूची हत्या करून पळून गेलेल्या जावयाला पोलिसांनी केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 05:00 AM2021-07-31T05:00:00+5:302021-07-31T05:00:37+5:30
हत्येची ही घटना पुराडा पोलीस ठाण्यांतर्गत कोटलडोह येथे गेल्या १८ जुलै रोजी घडली होती. मृतक तुळजाबाई मंगू कल्लो (६० वर्ष) ही कोरची तालुक्यातील मोहगावची रहिवासी होत. ती आरोपी आसारामची सासू आणि आत्याही होती. ती मुलीकडे आली असताना जावयासोबत शेतजमिनीच्या शाब्दिक वाद झाला. त्यातूनच आसारामने तिला बेदम मारहाण करून संपविले. तेव्हापासून तो फरार होता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतजमिनीच्या वादातून स्वत:च्या सासूच्या डोक्यावर, पाठीवर, हातपायांवर लाकडी पाटीने वार करून तिला जीवे मारणाऱ्या आणि नंतर फरार झालेल्या जावयाला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आसाराम बिजाराम कुमरे रा.कोटलडोह, ता.कुरखेडा असे या आरोपीचे नाव आहे.
हत्येची ही घटना पुराडा पोलीस ठाण्यांतर्गत कोटलडोह येथे गेल्या १८ जुलै रोजी घडली होती. मृतक तुळजाबाई मंगू कल्लो (६० वर्ष) ही कोरची तालुक्यातील मोहगावची रहिवासी होत. ती आरोपी आसारामची सासू आणि आत्याही होती. ती मुलीकडे आली असताना जावयासोबत शेतजमिनीच्या शाब्दिक वाद झाला. त्यातूनच आसारामने तिला बेदम मारहाण करून संपविले. तेव्हापासून तो फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूरच्या खापरी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पाे. निरीक्षक उल्हास भुसारी, गौरव गावंडे, उपनिरीक्षक दीपक शेळके यांच्या सहकार्याने स.पो.निरीक्षक विक्रांत सगणे, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
गावालगतच्या जंगलात, पहाडावर काढले दिवस
स्वत:ची आत्या असलेल्या सासूचा खून करून फरार झालेला आरोपी आसाराम कुमरे अटक टाळण्यासाठी गावाशेजारच्या जंगलात, पहाडी भागात वास्तव्यास होता. त्यानंतर तो कामाच्या शोधात नागपूरला गेला. याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला पोलिसांनी अलगद उचलले. सदर आरोपीवर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संपत्तीच्या लालचेने झाली मती भ्रष्ट
या प्रकरणातील आराेपीचे वर्तन गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. संपत्तीसाठीच त्याने सासूची हत्या केल्याचे दिसून येते. पण प्रत्यक्षात त्याने केलेल्या कृतीमुळे त्याला जेलमध्ये जावे लागले.