जीपचे भाडे चार हजार, दोन रुपये दराने बैलगाडीतून प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:46 PM2024-10-23T15:46:58+5:302024-10-23T15:49:55+5:30

खर्चाची मर्यादा पाळा : निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

Jeep rental at Rs 4,000 and bullock cart at Rs 2 for political campaigning | जीपचे भाडे चार हजार, दोन रुपये दराने बैलगाडीतून प्रचार

Jeep rental at Rs 4,000 and bullock cart at Rs 2 for political campaigning

दिगांबर जवादे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवशीचे किती रूपये भाडे राहील, हे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलोरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह दिवसाचे भाडे ३ हजार ८०० रूपये तर बैलगाडी, घोडागाडीचा प्रति तास दर २ रूपये ठरविण्यात आला आहे. 


निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनीक्षेपक लावला जाते. तसेच बॅनर, पोस्टर तसेच वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान, खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ४० लाख रूपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. दर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागते. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास तो उमेदवार निवडून येऊनही त्याचे पद धोक्यात येण्याची शक्यता असते.


कोणत्या वाहनासाठी किती रूपये दर राहणार आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे. संबंधित उमेदवाराने त्या वाहनधारकाला किती रूपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करावा लागतो. त्यानुसार निवडणूक विभागाने वाहनांचे दर ठरवले आहेत. 


निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवतेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसारच निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे. 


ऑटोरिक्षा १ हजार रूपये दिवस
ऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रति दिवस १ हजार रूपये, सायकल रिक्षा प्रति तास २ रूपये, बैलगाडी, घोडागाडी, सायकल प्रति तास २ रूपये, दुचाकी प्रति तास २० रूपये, ट्रॉलिसोबत ट्रॅक्टर प्रति दिवस ३ हजार रूपये दर ठरविला आहे.


४० सिटर प्रवाशी वाहनाचे भाडे १० हजार रूपये 
४० सिटर प्रवाशी वाहनाचे इंधनाशिवाय दिवसाचे भाडे ७ हजार ७०० रूपये तर इंधनासह १० हजार ४०० रूपये दर ठरवला आहे. १८ सिटर वाहनाचे दिवसाचे इंधनाशिवाय भाडे ४ हजार ६२५ तर इंधनासोबतचे भाडे ५ हजार ७६० रूपये ठरविले आहे. ५० सिटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे १२ हजार १५० रूपये ठरविण्यात आले आहेत.


मालवाहू वाहनासाठी पाच हजार रूपये 
मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनासह भाडे ५ हजार २६० रूपये ठरविले आहे. १० चाकी वाहन असल्यास १२ हजार ८०० रूपये, १२ ते १४ चाकी वाहन १३ हजार ६०० रुपये, १६ चाकी वाहनाचे भाडे १५ हजार ७०० रूपये ठरविले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागेल.


सायकल रिक्षा प्रति तास दोन रूपये कुठे मिळते सांगा साहेब ? 
काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नाही. त्यामुळे भाडे कमीच राहिल. मात्र निवडणूक विभागाने सायकल रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी, सायकल यासाठी प्रति तास केवळ दोन रूपये भाडे ठरविले आहे. ४०० रुपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही, अशास्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रूपये प्रति तास या दराने मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

Web Title: Jeep rental at Rs 4,000 and bullock cart at Rs 2 for political campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.