पत्रकारांचा मूकमोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

By admin | Published: October 3, 2016 02:11 AM2016-10-03T02:11:00+5:302016-10-03T02:11:00+5:30

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरलेला जिल्हाभरातील पत्रकारांचा मूकमोर्चा रविवारी प्रशासकीय यंत्रणा व अवघ्या समाजमनाचे लक्ष वेधणारा ठरला.

Journalists' silent march towards District Cemetery | पत्रकारांचा मूकमोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

पत्रकारांचा मूकमोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

Next

हक्कासाठी शेकडो पत्रकार उतरले रस्त्यावर : पत्रकार संरक्षण कायदा संमत करून पेंशन लागू करा
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरलेला जिल्हाभरातील पत्रकारांचा मूकमोर्चा रविवारी प्रशासकीय यंत्रणा व अवघ्या समाजमनाचे लक्ष वेधणारा ठरला. विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारांसह ग्रामीण भागातील शेकडो बातमीदार रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मूकमोर्चाच्या निमित्त्याने रस्त्यावर उतरले आणि या शिस्तबध्द मोर्चाने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तिथे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अनुपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये पत्रकारांसाठी संरक्षण कायदा, पेन्शनचा मुद्दा प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रासह समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लेखणीच्या माध्यमातून लढा देणाऱ्या आमच्या पत्रकारांच्या मागण्यांकडे शासन व सरकारने संवेदनशीलतेने लक्ष द्यावे, असा सूर या मोर्चादरम्यान उमटला. राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून हितसंबंधियांकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा सातत्याने होत असलेला प्रयत्न आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्यास सरकार करीत असलेली टाळाटाळ याचा निषेध करण्यासाठी राज्यातील पत्रकारांनी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या नेतृत्वात रविवारी राज्यभर मूकमोर्चे काढले. त्यानुसार गडचिरोली येथे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मूकमोर्चा काढण्यात आला. या आंदोलनास पत्रकारांच्या बहुसंख्य संघटनांनी पाठिंबा दिला. त्यात गडचिरोली प्रेस क्लब, गडचिरोली जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, गडचिरोली जिल्हा पत्रकार संघ व अन्य तालुका पत्रकार संघटनांचा सहभाग होता.
स्थानिक इंदिरा गांधी चौकातून या मूकमोर्चास सुरवात झाली. अतिशय शिस्तबध्द व शांततेच्या मार्गाने हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारांसह ग्रामीण भागातील अनेक बातमीदार यात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांना पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांची सभा पार पडली. त्यात पत्रकारांनी आपापले अनुभव कथन करून पत्रकारांचे प्रश्न मांडले. तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली, हेमंत डोर्लीकर, अरविंदकुमार खोब्रागडे, अविनाश भांडेकर यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलाउद्दीन लालानी, अनिल धामोडे, सुरेश नगराळे, विलास दशमुखे, रुपराज वाकोडे, कृष्णा मस्के, नंदकिशोर पोटे, मनीष कासर्लावार, दिलीप दहेलकर, रवी रामगुंडेवार, शालिकराम कराडे, लोमेश बुरांडे, पांडुरंग कांबळे, सिराज पठाण, श्रीधर दुग्गीरालापाटी नीलेश पटले, रवींद्र मोगिलवार, प्रमोद गेडेकर, चंद्रशेखर कोटगले, सुनील कावळे, रितेश वासनिक, किशोर मेश्राम, विष्णू वैरागडे, गजानन बारसागडे, विजयकुमार भैसारे, विलास ढोरे, राम लांजेवार, बंडू लांजेवार, क्रिष्णा चौधरी, इलियास खान पठाण, उमेश गझलपल्लीवार, श्रीकांत तेलकुंटलवार, रंगय्या रेपाकवार, नंदकिशोर वैरागडे, समीर कुरेशी, नासीर हाशमी, सीताराम बडोदे, अनिल गुरनुले, सुरेंद्र अलोणे, जावेद अली, अखिल कोलपकवार, श्याम दुल्लम, रवी कलकोटा, अमित तिपट्टी, वसंत तोकला, अमित साखरे यांच्यासह जिल्हाभरातील बातमीदार उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Journalists' silent march towards District Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.