भामरागड-कोठी मार्गाचा प्रवास खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:25 AM2018-08-06T01:25:37+5:302018-08-06T01:28:08+5:30
भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे. त्यातल्या त्यात भामरागड-कोठी या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गाचा नागरिकांचा प्रवास खडतर बनला आहे.
रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. खड्डे बुजवून रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी सातत्याने लावून धरली. मात्र रस्ता दुरूस्तीच्या कामात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सन १९९९-२००० या आर्थिक वर्षात प्रशासनाच्या वतीने कोठी मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र तेव्हापासूून या रस्त्याची आजवर एकदाही पक्की दुरूस्ती करण्यात आली नाही. सदर मार्गाच्या निर्मितीला आज १७ वर्ष पूर्ण होत असले तरी या रस्त्याच्या पुनर्जीवनाकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याचे कामही त्यावेळी दर्जेदार झाले नाही. त्यामुळे २०१२ मध्येच हा रस्ता पुरामुळे वाहून गेला. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने हे खड्डे चुकवित वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
भामरागड तालुक्यात नदी, नाल्यांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे पूलही बांधण्यात आले आहे. मात्र नाल्यावरील जुन्या पुलाच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्य्ोाने चार-पाच वर्षांत पुरामुळे अनेक लहान पूल वाहूून गेले आहेत. भामरागड-कोठी मार्गाची अवस्था दयनिय झाल्याने या मार्गावरील महामंडळाची बसफेरी बंद होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी अनेकदा बसफेरी बंद झाली होती.
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भामरागड भागात पोहोचेना
भामरागड-कोठी या मार्गाची गतवर्षीही प्रचंड दूरवस्था झाली होती. कोठी पोलीस मदत केंद्राच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मार्गावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्यात आले होते. तसेच महामंडळाची बसफेरी सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावाही करण्यात आला. त्यामुळे सध्या या मार्गावर बसफेरी सुरू आहे. मात्र येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास कोठी मार्गाची पूर्णत: वाट लागणार आहे. खासगी वाहतूकही बंद होण्याची शक्यता आहे.
एका गावाला दुसरे गाव व एका शहराला दुसरे शहर जोडण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत कोट्यवधी रूपयांची कामे शहरी भागात केली जात आहेत. मात्र भामरागड तालुक्यात गरज असूनही कोठीे मार्गाचे काम या योजनेतून मंजूर करण्यात आले नाही. सदर दोन्ही योजना या भागात पोहोचल्याच नाही.