चामाेर्शी-हरणघाट मार्गाचा प्रवास बनला खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:32+5:302021-01-08T05:56:32+5:30
भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील बऱ्याच प्रमुख रस्त्यांची प्रचंड चाळण झाली आहे. चामाेर्शी-चाकलपेठ हा चार किमीचा डांबरी रस्ता पूर्णत: उखडला ...
भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील बऱ्याच प्रमुख रस्त्यांची प्रचंड चाळण झाली आहे. चामाेर्शी-चाकलपेठ हा चार किमीचा डांबरी रस्ता पूर्णत: उखडला असून रस्त्याच्या मधाेमध नाल्या तयार झाल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष हाेत आहे. विशेष म्हणजे चार किमी अंतर गाठण्यासाठी अर्धा तासाचा वेळ खर्ची घालावा लागत आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर आहेतच पण बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली आहे. त्यामुळे रात्री वाहनधारकांना धुळीमुळे वाहन चालवायला मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. तसेच या धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास सुध्दा जाणवत आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या एक लक्षणांपैकी श्वसनाचा त्रास हे एक लक्षण आहे. त्यामुळे अनेक वाहनधारकांना आता याची भीती वाटायला लागली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले हाेते. काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पण तेव्हापासून आतापर्यंत जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणच्या रस्त्यावर बारीक डांबर उखडून खडी रस्त्यात पसरली आहे. आवागमन करणाऱ्या वाहनधारकांचे वाहन घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.धुळीमुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हाेत आहे. प्रशासनाने रस्त्याची ही गंभीर समस्या लवकर मार्गी लावावी, अशी मागणी जोर धरत आहे.
बाॅक्स....
कपड्यावर उडते धूळ
चामाेर्शी-हरणघाट डांबरी मार्ग उखडला असून या मार्गाला अनेक ठिकाणी खडीकरणाच्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी माेठे ट्रक, ट्रेलर व वाहन या मार्गावरून गेल्यास त्यामागून येणाऱ्या दुचाकीस्वारावर रस्त्यावरील संपूर्ण धूळ उडत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना घरी गेल्यावर कपडे बदलविल्याशिवाय पर्याय राहत नाही.