कुलभट्टी-बाेधनखेडा मार्गाचा प्रवास खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:35 AM2021-01-20T04:35:42+5:302021-01-20T04:35:42+5:30
धानोरा : तालुक्यातील कुलभट्टी-बोधनखेडा या कच्च्या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत ...
धानोरा : तालुक्यातील कुलभट्टी-बोधनखेडा या कच्च्या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
कुलभट्टी ते बोधनखेडा हे सात किमीचे अंतर असून या मार्गावर गिट्टी पूर्णत: उखडली आहे. सदर मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. सदर मार्गावर दोन नाले असून त्यावर पुलाचा अभाव आहे. नाल्यावर पूल बनविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चार महिने या मार्गावरील वाहतूक बंद असते. अशावेळी गावात एखादी आकस्मिक घटना घडल्यास बोधनखेडावासीयांना काहीच पर्याय नसतो.
कुणी गंभीर आजारी असल्यास अशा रुग्णांना औषधोपचारासाठी पावसाळ्यात मार्ग नसल्याने तालुका व जिल्हास्थळावर नेता येत नाही. सातत्याने मागणी करूनही कुलभट्टी-बोधनखेडा मार्गाची जि.प. प्रशासनाने पक्की दुरुस्ती केली नाही. ग्रा. पं. ने ठराव पारित करून तो जि. प. प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र कार्यवाही झाली नाही. रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरवस्था झाली आहे. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष हाेत आहे. परिणामी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात मार्गाची पुन्हा दुरवस्था झाली. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.