मार्कंडादेव यात्रा दारू व खर्रामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:53 AM2019-03-11T00:53:53+5:302019-03-11T00:54:50+5:30
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यंदा सलग तिसऱ्या वर्षीही दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. मुक्तिपथच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने कडेकोट बंदोबस्त आणि विविध उपक्रमांद्वारे ही यात्रा नशामुक्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यंदा सलग तिसऱ्या वर्षीही दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. मुक्तिपथच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने कडेकोट बंदोबस्त आणि विविध उपक्रमांद्वारे ही यात्रा नशामुक्त झाली.
दरवर्षी महाशिवरात्रीला जिल्ह्यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आस्थेने येथे दर्शनासाठी येतात. पण दर्शनासाठी येतानाही तोंडात खर्रा आणि पोटात दारू ढोसून येणाऱ्यांचे प्रमाण येथे काही वर्षांपूर्वी लक्षणीय होते. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग पावत होते. यंदा तिसºया वर्षीही यात्रा नशामुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाद्वारे पानठेलाधारकांना तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुक्तिपथद्वारे ४० व्यसनमुक्ती स्वयंसेवक नेमण्यात आले होते. बाहेरून खर्रा घेऊन येणाऱ्यांची दर्शनाच्या रांगेत तपासणी करून खर्रा असल्यास तो जप्त करण्यात आला. तसेच खर्रा आत नेऊन मंदिराचे पावित्र्य भंग न करण्याचे आवाहन करीत ‘मी खरार्मुक्त आहे’ असा संकल्प असलेला बिल्लाही देण्यात आला. सोबतच स्वयंसेवकांद्वारे रोज दोन वेळा जनजागृती रॅली काढून व्यसनमुक्तीचे आवाहन लोकांना करण्यात आले. विशेष म्हणजे दोन वर्षे यात्रा सलग दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे एकूणच या वर्षी नशायुक्त पदार्थांचे प्रमाण खूप कमी आढळून आले.
सलग चार दिवस चाललेल्या या उपक्रमात गोळा झालेला खर्रा व इतरही साहित्याची गुरुवारी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, मुक्तिपथचे संचालक मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, मार्र्कंडादेव येथील सरपंच उज्वला गायकवाड, ग्रामसेवक दिनेश सराटे, यात्रा अधीक्षक डी. टी. भोगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, व्यवस्थापक जनार्दन जुनघरे आदी उपस्थित होते. मंदिरापासून बसस्थानकापर्यंत ही अंत्यात्रा नेऊन हा साठा जाळून नष्ट करण्यात आला.
खर्रा न विकणाऱ्या पानठेलाधारकांचा सत्कार
यात्रा काळात नियमांचे पालन करून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचा निर्धार पानठेलाधारकांनी केल्याने ही यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त झाली. या कृतीची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. नियमांना बगल देत काही पानाठेलाधारकांनी खर्रा विकण्याचा प्रयत्न केला. अशांना ग्रामपंचायतद्वारे लवकरच नोटीस दिली जाणार आहे.