वाघाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी वैनगंगेत उडी
By admin | Published: June 16, 2017 12:54 AM2017-06-16T00:54:35+5:302017-06-16T00:54:35+5:30
वाघाच्या हल्ल्यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी वैनगंगा नदीच्या पाण्यात उडी घेतल्याची घटना रवी गावापासून एक किमी अंतरावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : वाघाच्या हल्ल्यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी वैनगंगा नदीच्या पाण्यात उडी घेतल्याची घटना रवी गावापासून एक किमी अंतरावर घडली.
जगन शेंडे रा. कोरेगाव चोप ता. देसाईगंज असे सुदैवी इसमाचे नाव आहे. जगन शेंडे हे रवी येथील स्वत:च्या मुलीला भेटण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी जावयासोबत वैनगंगा घाटानजीक असलेल्या जावयाच्या शेतीवर गेले होते. वैनगंगा नदीत काही मासेमार नावेच्या सहाय्याने मासेमारी करीत होते. जगन शेंडे काठावर उभा राहून मासेमारी पाहत होता. दरम्यान नरभक्षक वाघ चोरपावलाने शेंडे यांच्याजवळ आला. ही बाब लक्षात येताच शेंडे यांनी वैनगंगा नदीच्या पाण्यात उडी मारली. मासेमारांनी धाव घेऊन जगन शेंडे यांना सुखरूप वाचविले. देलोडा येथील शेतकऱ्याचे दोन बैल ठार केल्यानंतर वन विभागाने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.