न्यायदान प्रक्रिया सुरळीत व्हावी
By admin | Published: January 15, 2017 01:29 AM2017-01-15T01:29:02+5:302017-01-15T01:29:02+5:30
कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. कुरखेडाच्या या नवनिर्मित इमारतीतून न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी,
भूषण गवई : न्यायालय इमारतीचे उद्घाटन
कुरखेडा : कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. कुरखेडाच्या या नवनिर्मित इमारतीतून न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
कुरखेडा येथील दिवाणी न्यायालयाच्या नव निर्मित इमारतीचे उद्घाटन शनिवारी न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, कुरखेडाचे प्रभारी दिवाणी न्यायाधीश कु. रा. सिंघेल, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद बुध्दे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. जिल्ह्यातील ऐतिहासीक व धार्मिक स्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळेल. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसला जाईल, असे ते म्हणाले.
न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांनी ज्यासाठी कुरखेडा येथे न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम झाले. तो हेतू साध्य झाला पाहिजे. सकारात्मक मानसिक ठेवून येथील न्यायप्रक्रिया गतीमान करावी, असे आवाहन न्यायमूर्ती देशमुख यांनी केली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इमारत बांधकाम केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, कार्यकारी अभियंता बूग, कंत्राटदार कमलेश पटेल, उपविभागीय अभियंता सुनिल मार्लीवार, शाखा अभियंता अजय चहांदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान यांनी साकारलेल्या गडचिरोली अॅप व यूजर मॅन्युअल या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार न्यायाधीश सिंघेल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)३०८ खटले प्रलंबित
कुरखेडा येथील ०.८० हेक्टर भूखंडावर चार कोटी रूपये खर्च करून न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. कुरखेडाच्या न्यायालयात दिवाणी ५२ व फौजदारी २५६ असे एकूण ३०८ खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती प्रास्ताविकेतून वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद बुध्द यांनी यावेळी दिली.