माओवाद्यांच्या पत्रकाने कमलापुरात खळबळ
By admin | Published: September 18, 2015 01:14 AM2015-09-18T01:14:21+5:302015-09-18T01:14:21+5:30
पोलिसांच्या आक्रमक नियोजनामुळे मागील दोन वर्षांपासून माओवादी चळवळीला प्रचंड हादरे बसत आहेत.
गडचिरोली : पोलिसांच्या आक्रमक नियोजनामुळे मागील दोन वर्षांपासून माओवादी चळवळीला प्रचंड हादरे बसत आहेत. एकीकडे नक्षलविरोधी अभियान राबवून नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याची रणनीती पोलिसांनी आखली. तर दुसरीकडे नक्षल आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात कमालीचे यशस्वी झाले आहे. तर अनेक मोठ्या नक्षलवाद्यांना अटक करण्यातही पोलिसांना यश आले आहे. या सर्व पार्श्वभूमिवर माओवादी संघटना भाकपा (माओवादी) च्या वतीने २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत भारत की कम्युनिस्ट पार्टीची ११ वी वर्षगाठ गावागावात उत्साहात साजरी करण्याचे आवाहन माओवादी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
अहेरी तालुक्यातील कमलापूर भागात माओवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री या आशयाचे पत्रक व बॅनर लावले आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागांमध्ये माओवादी नेहमीच पत्रक व बॅनरच्या माध्यमातून आपल्या विविध कार्यक्रमांची माहिती नागरिकांना देत असतात. बुधवारी कमलापूर भागात लावण्यात आलेल्या बॅनरवर पार्टी क्रांतिकारी जनकमिटियों को मजबूत करेंगे, विस्तार करेंगे, आॅपरेशन गी्रनहंट को हटायेंगे, जनता की राजसत्ता को मजबूत करेंगे, ब्राह्मणवादी, हिंदू फासीवादी नीती, पुंजीवादी, साम्राज्यवादी, कुटनैतिकविरोध में लढेंगे, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या मजकुराखाली भाकपा (माओवादी) असा उल्लेख करण्यात आला आहे.
पत्रकात व बॅनरमध्ये २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत सप्ताह साजरा करून चळवळीची ११ वी वर्षगाठ साजरी करण्याबाबतही सूचविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात गडचिरोली पोलीस दलाने विविध चकमकीमध्ये दोन माओवादी ठार केले आहे. माओवाद्यांनी या घटनेचाही एटापल्ली, कोरची तालुक्यात पत्रके टाकून निषेध केला होता. पोलीस दल माओवाद्यांच्या सर्व षडयंत्रांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले असून माओवादी चळवळीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
अहेरी तालुक्यातील कमलापूर हा कधीकाळी माओवाद्यांचा गड होता. जिल्ह्याच्या नक्षल चळवळीची सुरुवात या भागात जनसभा घेऊन माओवाद्यांनी केली होती. परंतु आता या भागातूनही माओवादी चळवळीला उतरती कळा लागली असून माओवाद्यांना या भागात आपला जनाधार टिकवून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे पोलीस दलाने मागील दहा वर्षात १ हजार २६५ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र स्टेट कमिटी सदस्य, डिव्हीजनल सेक्रेटरी, एरिया कमांडर, दलम कमांडर अशा वरिष्ठ नक्षल कॅडरचा समावेश आहे, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)