काेंडवाडे जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:38+5:302020-12-25T04:28:38+5:30
भामरागड : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवाशी भरण्यास बंदी असली तरी भामरागड ...
भामरागड : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवाशी भरण्यास बंदी असली तरी भामरागड येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासगी वाहनांमुळे एसटीला प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. तसेच वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
कोंडवाडे जीर्णावस्थेत
अहेरी : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छपर पूर्णपणे उडून गेले आहे.
जळाऊ लाकडाच्या तुटवड्याने नागरिक त्रस्त
कोरची : येथे विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी वास्तव्य करतात. परंतु त्यांना वेळेवर जळाऊ लाकडे उपलब्ध होत नाही. स्थानिक नागरिकांना वन विभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत आहे. बहुतांश डेपोंवर जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
गोगाव बस थांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
झिंगानूर परिसरातील बंधारा दुरूस्तीकडे दुर्लक्ष
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे.
आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी
आलापल्ली : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये फवारणी करावी.
भूमीअभिलेखची पदे रिक्त
एटापल्ली : उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहे. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.
काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात
मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्र्कं डा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रूंदीकरण करा
कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दूरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण करावे.
हातगाडींचे अतिक्रमण
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध विकत असतात. या दुकानासमोर उभे राहून अनेक नागरीक वस्तू खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते.त्यामुळे अतिक्रमण काढावे, अशी मागणी हाेत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
निवासस्थान सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रूपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभाली अभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक तसेच वनविभागाचे कर्मचारी तालुका मुख्यालयी राहत आहेत.