कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:24 AM2018-08-18T01:24:48+5:302018-08-18T01:25:21+5:30
धानपिकाची रोवणी होऊन रोपांना फुटवे येण्याचा कालावधी सुरू झाला आहे. अशावेळी खोडकीडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, लष्कर अळी व गाद माशी यासारख्या रोगांचा धानपिकांवर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : धानपिकाची रोवणी होऊन रोपांना फुटवे येण्याचा कालावधी सुरू झाला आहे. अशावेळी खोडकीडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, लष्कर अळी व गाद माशी यासारख्या रोगांचा धानपिकांवर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. यावर प्रतिबंध म्हणून कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर वैरागड भागातील काही शेतांमध्ये कीड नियंत्रणांसाठी कामगंध सापळे लावले आहेत.
धानपिकाच्या शेतात कामगंध सापळे प्रतिहेक्टरी पाच याप्रमाणे लावावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या कामगंध सापळ्यात मादी किडीचा वास असतो. या वासावर नर आकर्षित असतो. रात्रभर सापळ्यात अडकून पडलेले कीड दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी नष्ट करावे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धानपिकांवरील किडींचा प्रादुर्भाव थांबविला जातो. धानपिकावरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी कीटकनाशकाचा जास्त वापर करू नये, कीटकनाशकाच्या अती वापरामुळे धान शेतीतील असणाऱ्या मिरीड, ढेकून, कोळी आदी विविध मित्र कीटक नष्ट होतात. किडीच्या नायनाटासाठी धानपीक शेतीतील मित्र कीटकाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी महागडी औषधांची फवारणी करावी लागत नाही.
आरमोरी तालुका कृषी विभागाने तालुक्याच्या प्रत्येक गावातील तीन ते चार ठिकाणच्या शेतात कामगंध सापळे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संबंधित शेतकऱ्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तयार केलेली पुस्तक भेट देऊन नियंत्रणासाठी जागृती सुरू आहे.