कर वसुलीत कोरची नगर पंचायत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 12:56 AM2017-04-18T00:56:45+5:302017-04-18T00:56:45+5:30

सन २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या एकमेव नगर पंचायतींनी १०० टक्के मालमत्ता व पाणी कर वसुली करून..

Karate Nagar Panchayat top | कर वसुलीत कोरची नगर पंचायत अव्वल

कर वसुलीत कोरची नगर पंचायत अव्वल

googlenewsNext

दुसऱ्या स्थानी चामोर्शी, कुरखेडा : मालमत्ता व पाणीपट्टी
दिलीप दहेलकर गडचिरोली
सन २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या एकमेव नगर पंचायतींनी १०० टक्के मालमत्ता व पाणी कर वसुली करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत दुसऱ्या ठिकाणी चामोर्शी नगर पंचायत असून पाणी कराच्या वसुलीत दुसऱ्या स्थानी कुरखेडा नगर पंचायत आहे.
मालमत्ता व पाणी कर हे नगर पालिका व नगर पंचायतीचे मुख्य उत्पन्न स्त्रोत आहे. शहरातील नागरिकांना दिवाबत्तीची सोय, पाणी पुरवठा व इतर पायाभूत सुविधा पुरविण्याच्या कामास्तव शहरवासीयांकडून पाणी व मालमत्ता कर आकारले जाते. भाजप्रणित राज्य सरकारने सर्व यंत्रणांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्या अनुषंगाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून सर्व नगर पंचायत, नगर पालिका व ग्रामपंचायतींना २०१६-१७ या वर्षात १०० टक्के कर वसुलीचे फर्मान सोडले होते. मात्र १०० टक्क्याच्या जवळ जिल्ह्यातील काही मोजक्या नगर पंचायत व नगर पालिका पोहोचल्या आहेत. ग्रामपंचायतीचीही अवस्था अशीच आहे.
सन २०१६-१७ या वर्षात कोरची नगर पंचायतीची शहरवासीयांकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ७ लाख ५४ हजार ४१८ रूपयांची मालमत्ता कराची मागणी होती. नगर पंचायत प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत सर्वच ७ लाख ५४ हजार ४१८ रूपये मालमत्ता कर वसुली केली असून याची टक्केवारी १०० आहे. मालमत्ता करात दुसऱ्या स्थानी असलेल्या चामोर्शी नगर पंचायतीची वसुलीची टक्केवारी ९०.२४ आहे. चामोर्शी नगर पंचायतीची शहरवासीयांकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ६६ लाख २५ हजार ४८३ रूपयांची मागणी होती. यापैकी नगर पंचायतीने ३१ मार्चपर्यंत ५९ लाख ७९ हजार ३३२ रूपयांची मालमत्ता कर वसुली केली. याची टक्केवारी ९०.२४ आहे. पाणी कर वसुलीतही सन २०१६-१७ या वर्षात कोरची नगर पंचायत प्रथमस्थानी आहे.
कोरची नगर पंचायतीची शहरवासीयांकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण २ लाख ८ हजार ४३५ रूपयांची पाणी कराची मागणी होती. नगर पंचायतीने २ लाख ८ हजार ४३५ रूपये वसूल करून १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. पाणी कर वसुलीत कुरखेडा नगर पंचायत जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी आहे.
कुरखेडा नगर पंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून ६ लाख ४२ हजार १२५ रूपयांची मागणी होती. यापैकी नगर पंचायतीने ३ लाख ९५ हजार ५९२ रूपयांची पाणी कर वसुली केली असून या कर वसुलीची टक्केवारी ६१.६१ आहे.

गृहकरात गडचिरोली तर पाणीकरात देसाईगंज आघाडीवर
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका आहेत. गडचिरोली पालिकेची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून ३ कोटी ९६ लाख ८२ हजार ४२२ रूपयांची मालमत्ता कराची मागणी होती. यापैकी गडचिरोली पालिकेने ३ कोटी १८ लाख ९० हजार ५०९ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी ८०.३६ आहे. देसाईगंज नगर पालिकेची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ४४ लाख ४७ हजार ५८९ रूपयांची मालमत्ता कराची मागणी होती. यापैकी देसाईगंज पालिकेने ३१ मार्चपर्यंत ७९ लाख ९८ हजार ३४२ रूपये मालमत्ता कर वसुली केली असून याची टक्केवारी ५५.३६ आहे. गडचिरोली पालिकेची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ९१ लाख ६४ हजार १३८ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ९८ लाख ५० हजार १९५ रूपये पाणी कर वसुली पालिकेने केली असून याची टक्केवारी ५१.३९ आहे. देसाईगंज पालिकेची एकूण ७२ लाख ३० हजार ५४६ पाणी कराची मागणी होती. यापैकी ५१ लाख ७८ हजार १६६ रूपये पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी ७१.६१ आहे. मालमत्ता कर वसुलीत गडचिरोली तर पाणी कर वसुलीत देसाईगंज नगरपालिका आघाडीवर आहे.

Web Title: Karate Nagar Panchayat top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.