कराडीचे आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:47 AM2018-05-21T00:47:59+5:302018-05-21T00:47:59+5:30
कुरखेडा तालुक्यातील कराडी येथील आरोग्य उपकेंद्रातील कार्यरत आरोग्य सेविका मिनू नाथानी यांनी २०१६ मध्ये ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. तेव्हापासून कराडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका नसल्याने गरोदर व स्तनदा मातांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील कराडी येथील आरोग्य उपकेंद्रातील कार्यरत आरोग्य सेविका मिनू नाथानी यांनी २०१६ मध्ये ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. तेव्हापासून कराडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका नसल्याने गरोदर व स्तनदा मातांची गैरसोय होत आहे. तसेच हे उपकेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून कुलूपबंद आहे.
कराडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात एक आरोग्य सेविका व एक आरोग्य सेवक कार्यरत होते. यापैकी आरोग्य सेविका नाथानी यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर तेथील आरोग्य सेविकेचे पद वर्षभर रिक्त राहिले. त्यानंतर कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून के. एस. परिहार मागील काही दिवसांपूर्वी सदर उपकेंद्रात रूजू झाल्या होत्या. मात्र त्या सध्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी असल्याने येथील आरोग्य सेवेचे काम पूर्णत: थांबले आहे. गरोदर माताची नोंदणी, तपासणी, बाल संगोपण, लसीकरण आदी कामे करण्यासाठी आरोग्य सेविका नसल्याने बालमृत्यू व मातामृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कराडी येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेवक घरोघरी जाऊन प्राथमिक स्वरूपाच्या आजाराचा उपचार करीत आहेत. गरोदर व स्तनदा मातांची तपासणी करण्यासाठी आरोग्य सेविकेची भूमिका महत्त्वाची असते. मात्र येथे सध्या आरोग्य सेविका नसल्याने हे सर्व काम व आरोग्य सेवा ठप्प आहे.
कराडी भागात अनेक गावांचा समावेश आहे. या भागात खासगी डॉक्टरांचीही वानवा आहे. त्यामुळे बरेचशे रूग्ण छोट्या आजाराच्या उपचारासाठी सदर उपकेंद्राकडे धाव घेतात. आरोग्य सेवा सुरळीत होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सदर उपकेंद्रात तत्काळ आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीचे सदस्य शालिकराम कुमरे, दिलेश्वर कवाडकर, विजया टेकाम, माधुरी रामटेके, देविदास कवाडकर, बादल कुमरे, लोकनाथ उईके, गिरीधर नारनवरे, चितेश्वर उईके आदींनी लेखी निवेदनातून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना व आरोग्य विभागाला दिली आहे. या संदर्भात ग्रा.पं. सदस्यांचा पाठपुरावाही सुरू आहे.
उपकेंद्रातील कर्मचारी करतात अपडाऊन
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत ३०० च्या आसपास उपकेंद्र आहेत. आरोग्य सेवाही २४ तासांची व अत्यावश्यक असल्याने उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी तालुका, जिल्हास्तरावरून तसेच काही कर्मचारी मोठ्या गावात राहून कर्तव्याच्या ठिकाणी अपडाऊन करतात. परिणामी रात्रीच्या सुमारास गंभीर रूग्णांवर औषधोपचार होत नाही. आरोग्य कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.