काेरेगावात बैलबंडीवरून निघाली वरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:43 AM2021-03-01T04:43:28+5:302021-03-01T04:43:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव, चाेप : पेट्राेल व डिझेलवाढीमुळे लग्नाची वरात नेण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे काेरेगाव येथील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव, चाेप : पेट्राेल व डिझेलवाढीमुळे लग्नाची वरात नेण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे काेरेगाव येथील नवरदेवाने चक्क बैलबंडीवरून लग्नाची वरात काढली. त्याची ही वरात जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे.
जवळपास २० वर्षांपूर्वी लग्नाची वरात बैलबंडीवरूनच काढली जात हाेती. जेवढ्या जास्त बैलबंड्या तेवढा ताे नवरदेव प्रतिष्ठित समजला जात हाेता. लग्नासाठी येणारे प्रत्येक कुटुंब स्वत:ची बैलबंडी, छकडा किंवा खासर पकडत हाेते. लग्न ठिकाण किती दूर आहे, यावरून लग्न वरात काढण्याचा वेळ ठरविला जात हाेता. लग्न दूरच्या गावी असेल तर रात्रभर प्रवास करून वरात लग्न ठिकाणी सकाळी पाेहाेचत हाेती. मात्र चारचाकी वाहने भाड्याने उपलब्ध हाेण्यास सुरुवात झाल्यानंतर बैलबंडीची वरात ही संकल्पना मागे पडली. आता तर ती लुप्तच झाली आहे. प्रत्येक नवरदेव स्वत:ची वरात वाहनांनीच लग्नगावी पाेहाेचवतो. यासाठी हजाराे रुपये खर्च हाेतात. लग्नानंतर नवरदेवाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. काेरेगाव येथील नवरदेवाने मात्र या खर्चाला फाटा देत चक्क बैलबंडीवरून वरात काढली.
काेरेगाव येथील अमाेल दादाजी राऊत या नवरदेवाचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नांदेड येथील प्रांजली सुधाकर आंबडारे हिच्यासाेबत रविवारी काेरेगाव येथेच पार पडला. लग्नस्थळापर्यंत वाजतगाजत नवरदेवाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. यादरम्यान मित्रपरिवार नाचतो, तर नवदेव चारचाकी वाहनात किंवा घाेड्यावर बसून राहतो. यासाठी एखादे वाहन हमखास भाड्याने घेतले जाते. मात्र काेरेगावच्या नवरदेवाने काेणतेही वाहन भाड्याने न घेता बैलबंडीवरून वरात काढली. त्याची वरात परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. डिझेल व पेट्राेलच्या किमती वाढल्याने वाहनाच्या भाड्याचे दरही वाढले आहेत. या खर्चाला फाटा देत अमाेलने इतर नवरदेवांसमाेर नवीन आदर्श ठेवला आहे.
बाॅक्स
जुन्या आठवणींना उजाळा
अमाेलने बैलांवर झूल टाकली तसेच बैलबंडीही सजविण्यात आली हाेती. बैलबंडीवर शेतकरी असे लिहिण्यात आले हाेते. सजलेली बैलबंडी बघून अनेकांना जुन्या काळातील लग्नांची आठवण झाली. लग्नातील अनावश्यक खर्चांना आळा घालण्यासाठी लग्नांची जुनीच पद्धत चांगली हाेती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.