मुख्यालयी राहून नागरिकांना आरोग्य सेवा द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:19 AM2018-07-16T00:19:54+5:302018-07-16T00:20:36+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. येथील नागरिकांना तालुकास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. येथील नागरिकांना तालुकास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहून सेवा द्यावी, असे निर्देश राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार व अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील हे शनिवारपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन येथील सोयीसुविधा तसेच समस्यांचा आढावा घेतला. यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना ते निर्देश देत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, एटापल्लीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गादेवार, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित बर्डे, प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कदम, डॉ. अर्चना हिरेखन, डॉ. राकेश हिरेखन, ब्रदर शंकर तोगरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सतीश पवार यांनी आढावा घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन सुध्दा आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांना निर्देश दिले.