निधी खर्च करण्यात गजबेंची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:38 PM2019-04-24T23:38:24+5:302019-04-24T23:40:14+5:30

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांपैकी आरमोरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक आमदार निधी खर्च झाला आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कृष्णा गजबे यांनी वर्षभरात ७५ कामे प्रस्तावित करून आघाडी घेतली आहे.

The key to the cost of funding | निधी खर्च करण्यात गजबेंची आघाडी

निधी खर्च करण्यात गजबेंची आघाडी

Next
ठळक मुद्देशेवटच्या तीन महिन्यात होणार कसरत : विंधन विहिरी आणि अंतर्गत रस्त्याच्या कामांवर सर्वाधिक खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांपैकी आरमोरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक आमदार निधी खर्च झाला आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कृष्णा गजबे यांनी वर्षभरात ७५ कामे प्रस्तावित करून आघाडी घेतली आहे.
गडचिरोली विधानसभा मतदार संघात आमदार डॉ.देवराव होळी यांनी ४६ कामे प्रस्तावित केली तर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केवळ १९ कामे प्रस्तावित केल्याने त्यांचा ४४ टक्के निधी परत गेला आहे. तो आता नवीन आर्थिक वर्षात त्यांच्या स्थानिक विकास निधीत जमा होईल. परंतू लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आणि विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मिळणाऱ्या जेमतेम तीन महिन्यात खर्च करताना कसरत करावी लागणार आहे.
आमदारांना दरवर्षी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळतो. त्यातून आपल्या मतदार संघातील विविध लोकोपयोगी कामे ते प्रस्तावित करतात. त्यांच्या शिफारसीनुसार त्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून तेवढा निधी त्या कामासाठी वळता केला जातो. गेल्या वर्षभरातील कामांवर एक नजर टाकल्यास आमदारांनी जास्तीत जास्त निधी विंधन विहीरींचे काम, हातपंप तसेच गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामांसाठी प्रस्तावित केल्याचे दिसून येते.
सर्वाधिक ७५ कामे प्रस्तावित करणाऱ्या आमदार गजबे यांनी आरमोरी आणि वडसा तालुक्यातील कामांवर जास्तीत जास्त निधी प्रस्तावित केल्याचे दिसून येते. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात निधी दिला आहे. परंतू कोरची तालुक्यातील कामांवर त्यांनी वक्रदृष्टी फिरवल्याचे दिसून येते. कोरची तालुक्यातील नागरिकांवर त्यांची नाराजी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. एकूण १ कोटी ९४ लाखांच्या कामांपैकी १ कोटी १९ लाखांचा निधी वितरित झाला असून ७५ लाख निधी देणे बाकी आहे.
गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी ४६ कामे प्रस्तावित करताना गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यावर जास्त प्रेम दाखविले आहे. त्या तुलनेत धानोरा तालुक्यातील कामे कमी आहेत. त्यांच्या कामांची किंमत १ कोटी ८९ लाख रुपये आहे. त्यापैकी ७२ लाख ४५ हजार वितरित झाले असून १ कोटी १७ लाखांचा निधी देणे बाकी आहे.
पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रस्तावित केलेल्या १९ कामांपैकी जास्तीत जास्त कामे अहेरी तालुक्यातील आहेत. काही मोजकी कामे सिरोंचा तालुक्याच्या वाट्याला आणि एक काम (समाज मंदिर) एटापल्लीच्या वाट्याला आले आहे. त्यांच्या मतदार संघात येणाºया मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यावर त्यांची मेहरनजर या आर्थिक वर्षात फिरलेली नाही. त्यांचा शिल्लक असलेला निधी नवीन आर्थिक वर्षात मिळाल्यानंतर दोन्ही वंचित तालुक्यातील कामे मंजूर होतील का, याकडे तेथील नागरिकांचे लक्ष असणार आहे. आमदार निधीतील कामांमधून गावातील छोट्या समस्या दूर होत असल्याने कार्यकर्ते जुळण्यास मदत होते.
आचारसंहितेचा फटका
ऐन मार्च महिन्याच्या लगबगीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आली. त्यामुळे आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील कामांच्या मंजुरीला ब्रेक लागला. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात गडचिरोली-चिमूर मतदार संघातील मतदान आटोपले असले तरी येत्या २३ मे रोजी निवडणूक निकाल लागल्यानंतरच उर्वरित कामांच्या प्रस्तावांना गती येईल. विशेष म्हणजे जून, जुलै आणि आॅगस्ट हे तीनच महिने आमदारांना मिळणार आहेत. सप्टेंबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास कामे थांबतील. त्यामुळे तीन महिन्यात आमदार निधीतून जास्तीत जास्त कामे करताना आमदारांची कसरत होणार आहे.

Web Title: The key to the cost of funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.