'खाकी'नं निभावलं रक्तापलीकडचं नातं, हेलिकॉप्टरनं पोहोचवलं एक पिशवी रक्त
By संजय तिपाले | Updated: September 11, 2024 14:00 IST2024-09-11T13:59:49+5:302024-09-11T14:00:20+5:30
पुरामुळे अडला होता मार्ग: प्रसूती झालेल्या मातेसाठी सरसावले प्रशासन

'Khaki' played a relationship beyond blood, helicopter delivered a bag of blood
गडचिरोली : अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवसीबहुल भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. ८ सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली होती. मात्र, या मातेला रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत ११ सप्टेंबरला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोच करण्यात आली. पूरसंकटात आरोग्य विभागाची तत्परता व 'खाकी' वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मंतोशी गजेंद्र चौधरी (२४,रा.आरेवाडा ता. भामरागड) असे महिलेचे नाव आहे. ८ सप्टेंबर रोजी तिला प्रसववेदना जाणवू लागल्या. मात्र, याचवेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भामरागडचा संपर्क तुटला होता. मात्र, आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवत पुरातून वाट काढत तिला दवाखान्यात आणले. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी यासाठी डॉक्टरांची मदत केली. दरम्यान, ९ रोजी मंतोशीची सुरक्षित प्रसूती झाली. दरम्यान, मंतोशीचा B-ve हा रक्तगट आहे. या रक्ताची एक पिशवी तिला चढविण्यात आली होती. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणखी एका रक्त पिशवीची गरज होती. पुराने रक्ताची पिशवी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले होते. एकीकडे पूर व दुसरीकडे खराब हवामान यामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी पोहाेचविण्यास अडचण येत होती. अखेर ११ रोजी आकाश निरभ्र होताच गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी भामरागडला रवाना झाले. यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलिस दलाचे हेलिकॉप्टर विनाविलंब उपलब्ध करुन दिले. सध्या माता व बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
रक्ताची एकच पिशवी होती उपलब्ध
दरम्यान, B-ve रक्तगट दुर्मिळ असून एकमेव रक्तपिशवी सध्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होती. मंतोशी चौधरी या मातेसाठी ही रक्तपिशवी पोहोच करण्यात आली. आरोग्य व पोलिस विभागाच्या समन्वयामुळे अतिदुर्गम भागात तत्परतेने वैद्यकीय सुविधा पुरविण्यात यश आले व मंतोशी चौधरीवरील धोका टळला आहे.