दोन्ही नगरपालिकेत खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:49 AM2018-01-24T00:49:39+5:302018-01-24T00:50:21+5:30
मंगळवारी झालेल्या देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत भाजपने खांदेपालट करुन नव्या नगरसेवकांना संधी दिली. ही निवड बिनविरोध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/देसाईगंज : मंगळवारी झालेल्या देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत भाजपने खांदेपालट करुन नव्या नगरसेवकांना संधी दिली. ही निवड बिनविरोध झाली.
गडचिरोलीत दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर व मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रत्येक विषय समितीच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नाव असल्याने सर्वांची निवड अविरोध झाली. देसाईगंजमध्येही सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नाव असल्याने सभापतींची निवडणूक अविरोध पार पडली. गडचिरोली पालिकेत बांधकाम समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान सभापती आनंद शृंगारपवार यांची पुनर्निवड करण्यात आली. वित्त व नियोजन समितीचे सभापती म्हणून ज्येष्ठ नगरसेवक संजय मेश्राम यांची निवड झाली. पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणून प्रवीण वाघरे, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बालकल्याण सभापती म्हणून रंजना गेडाम यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्याकडे आरोग्य समितीचे सभापतीपद कायम ठेवण्यात आले. स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व प्रशांत खोब्रागडे यांची निवड झाली.
निवडणुकीनंतर आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पहार घालून कौतुक केले.
गेल्या काही दिवसांपासून कामे होत नसल्याच्या कारणावरुन बहुतांश नगरसेवक नाराज होते. अशातच सभापतीपदाची निवडणूक येऊन ठेपल्याने नगरसेवकांची नाराजी टोकाला पोहचली होती. मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते व अन्य ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुन कौशल्याने मतभेद मिटविल्याने आजची सभापती पदाची निवडणूक अविरोध पार पडली. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. विशेष म्हणजे बºयाच वर्षानंतर भाजपला या दोन्ही नगर पालिकेचे सत्तासूत्रे सांभाळण्याची संधी मिळाली.