खरीप पिकाची पेरणी केवळ १८ टक्क्यांवर
By admin | Published: July 17, 2016 01:04 AM2016-07-17T01:04:40+5:302016-07-17T01:04:40+5:30
यंदाच्या खरीप हंगामात उशीरा आलेला पाऊस त्यानंतर अतिवृष्टीने धान पिकाचे पऱ्हे कुजल्यामुळे ...
धान रोवणी १३ टक्के : पावसाने पऱ्हे सडल्याचा परिणाम
गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात उशीरा आलेला पाऊस त्यानंतर अतिवृष्टीने धान पिकाचे पऱ्हे कुजल्यामुळे धान पिकाच्या रोवणीचे काम केवळ १३ टक्क्यावर तर जिल्ह्यात खरीप पिकाची पेरणी १८ टक्क्यावर पोहोचली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची रोवणी व इतर पिकांची पेरणी माघारली असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्व पिकांचे मिळून एकूण १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. यामध्ये भात नर्सरीचे क्षेत्र ९ हजार ९३३ आहे. तर आवत्या २० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर आहे. रोवणी व आवत्या मिळून भात लागवडीची एकूण पेरणी २० हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर झाली असून याची टक्केवारी १३ आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात २ हजार ९५४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. कुरखेडा तालुक्यात १ हजार ८८५ हेक्टर क्षेत्र आरमोरी तालुक्यात ३ हजार ९८१ हेक्टर क्षेत्र, चामोर्शी तालुक्यात १ हजार ३५ हेक्टर क्षेत्र, सिरोंचा तालुक्यात १४३ हेक्टर, अहेरी तालुक्यात ५२० हेक्टर, एटापल्ली तालुक्यात ३६५ हेक्टर, धानोरा तालुक्यात ६ हजार १८३ हेक्टर, कोरची तालुक्यात ३ हजार २४२ हेक्टर, देसाईगंज तालुक्यात ४६३ हेक्टर क्षेत्र, मुलचेरा २५६ हेक्टर व मुलचेरा तालुक्यात ३०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.
इतर तृण धान्याची पेरणी ५३५ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यात मक्का पिकाची पेरणी २ हजार ३३८ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत झाली आहे. तूर पिकाची पेरणी ६ हजार ४३२ हेक्टर, मूग ३५० हेक्टर, उडीद १३० हेक्टर, तीळ ६७४ हेक्टर तर सोयाबिनची ५ हजार ६४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ६ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची पेरणी आतापर्यंत झाली आहे.
एकूण ४ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. तर १८१ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. खरीप पिकाच्या पेरणीत धानोरा, सिरोंचा व कोरची तालुके आघाडीवर आहेत. येथे धान रोवणीचे कामही गतीने सुरू आहे. शेतकरी धान रोवणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)
पीक हाती येण्यास होणार विलंब
यंदा पावसाच्या लहरीपणामुळे व उशीरा आगमन झाल्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात धान व इतर खरीप पिकांच्या पेरणीस वेग आला नाही. त्यानंतर आठवडाभर संततधार पाऊस बरसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पिकाचे पऱ्हे टाकणे शिल्लक राहिले. संततधार पाऊस थांबल्यानंतर दोन दिवसाने धान पिकाच्या पेरणीस वेग आला. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीचे काम लांबले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खरीप पिकाचे उत्पादन येण्यासाठी यंदा उशीर होणार आहे.