आरमोरीत २० हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन
By admin | Published: May 21, 2017 01:32 AM2017-05-21T01:32:58+5:302017-05-21T01:32:58+5:30
हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी विभागाने खरिपाचे
कृषी विभागाची तयारी : ११ लाभार्थी गट
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी विभागाने खरिपाचे वाढीव नियोजन केले असून २०१७-१८ या खरीप हंगामात १९ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे.
शेतकऱ्यांना समतोल खत नियोजन, एकात्मिक खत व्यवस्थापनाचे नियोजन तसेच रासायनिक खतावरील अवाजवी खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने सन २०१६-१७ या वर्षात आरमोरी तालुक्यात एकूण ३ हजार ४४० मातीचे नमूने तपासले. १०० पेक्षा अधिक जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण २५ मे ते ८ जून या कालावधीत केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत चालू वर्षात पीक पद्धतीवर आधारित प्रत्येक १० हेक्टर प्रमाणे २५ लाभार्थी शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला आहे. असे एकूण ११ लाभार्थी गट तयार करण्याचे नियोजन झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत पीक पद्धती, शाश्वत शेती, आत्माअंतर्गत सेंद्रीय शेती, प्रमाणिकरण योजना आदींच्या प्रचारासाठी कृषी विभाग तयार झाला आहे. गाव पातळीवर या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पेरणीच्या दरम्यान कीटकनाशके, खत व बियाणे यांची टंचाई जाणवू नये यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून कृषी केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचीही माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.