माेबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क पाण्याच्या टाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:28 AM2021-06-04T04:28:02+5:302021-06-04T04:28:02+5:30

एटापल्ली : बातमीचे शीर्षक वाचून विश्वास बसणार नाही; परंतु मोबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क गावातील पाण्याच्या टाकीवर, अगदी शेवटच्या मजल्यावर ...

Kids on a chucky water tank for mobile coverage | माेबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क पाण्याच्या टाकीवर

माेबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क पाण्याच्या टाकीवर

Next

एटापल्ली : बातमीचे शीर्षक वाचून विश्वास बसणार नाही; परंतु मोबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क गावातील पाण्याच्या टाकीवर, अगदी शेवटच्या मजल्यावर चढत आहेत. हा धक्कादायक प्रकार बघून आश्चर्याचा धक्का बसताे. अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

एटापल्ली तालुक्यात फक्त बीएसएनएलची माेबाईल सेवा आहे. तेही तालुक्यातील काही माेजक्याच गावात कव्हरेज मिळते. कव्हरेजची अडचण असली तरी, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. मग कसे कव्हरेज मिळेल, याकरिता मुले वाट्टेल ती शक्कल लढवतात. एटापल्लीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या येमली गावात पाण्याच्या टाकीवर कव्हरेज मिळण्याकरिता बांबू बांधून राऊटर बसविले आहे.

रविवारी येमली गावात अल्पवयीन सहा मुले-मुली चक्क पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पहायला मिळाले. यापैकी एक मुलगी व मुलगा पाण्याच्या टाकीच्या सर्वात उंच भागावर चढले होते. सदर प्रतिनिधी फोटो घेत असल्याचे लक्षात येताच ते सर्वजण घाईत खाली उतरू लागले. टाकीवर कशाला चढले होते? असा प्रश्न विचारला असता, सर्व मुले घाबरली. काहीच उत्तर न देता ती लगेच पसार झाली. परंतु हा सर्व प्रकार धक्कादायक होता.

सदर प्रतिनिधीने सर्व प्रकार सरपंच ललिता मडावी यांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी गावातील काही युवकांनी पाण्याच्या टाकीवर मोबाईल कव्हरेजकरिता बांबू बांधल्याचे सांगितले व येथून पुढे पाण्याच्या टाकीवर लहान मुले चढणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे सांगितले.

(बाॅक्स)

टाकीला संरक्षक भिंतीची गरज

शहरातील पाण्याच्या टाक्यांना संरक्षक भिंत किंवा काटेरी कुंपण केलेले असते. ग्रामीण भागातील पाण्याच्या टाक्या मात्र माेकळ्याच राहतात. त्यामुळे काेणीही सहज पाण्याच्या टाकीवर चढू शकतो. ग्रामीण भागातील टाक्यांनाही संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. तीन दिवसांपासून एटापल्ली येथे मोबाईल कव्हरेजची समस्या आहे. दिवसातून अनेकवेळा कव्हरेज जाते. बीएसएनएलने सेवेत सुधारणा करण्याची गरज आहे.

Web Title: Kids on a chucky water tank for mobile coverage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.