राजे, थोडे इकडेही लक्ष द्या हो !
By admin | Published: May 28, 2017 01:15 AM2017-05-28T01:15:19+5:302017-05-28T01:15:19+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे युवा आणि उच्चशिक्षित पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे नाव घेतले की त्यांचे ‘जरा हटके’
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे युवा आणि उच्चशिक्षित पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे नाव घेतले की त्यांचे ‘जरा हटके’ व्यक्तिमत्व जिल्हावासीयांच्या नजरेसमोर येते. बालपणापासून मुंबई व नंतर उच्च शिक्षणानिमित्त विदेशात राहिल्याने गडचिरोलीच्या मातीचा गंध त्यांना फारसा आकर्षित करीत नाही. मात्र या जिल्ह्याच्या मातीशी त्यांचे ऋणानुबंध निश्चितच जुळलेले आहेत.
जिल्ह्याच्या अहेरी येथील राजवाड्यात काही कौटुंबिक कार्यक्रम किंवा सुट्यांच्या निमित्ताने का असेना, अम्ब्रिशराव बालपणी निश्चितच खेळले-बागडले आहेत. पण त्यांचे मन या ठिकाणी जास्त रमले नाही. तरीही अहेरीच्या राजघराण्याची परंपरा पुढे नेणारे युवा वारसदार म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नागरिकांनी आपला कौल दिला. एरवी अनेक जिल्ह्यांचे पालकत्व स्थानिक किंवा जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना न देता लांबच्या जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या मंत्र्यांकडे आहे, पण गडचिरोलीत आर.आर.पाटील यांचा अपवाद सोडल्यास बहुतांश वेळा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी याच जिल्ह्याच्या आमदाराकडे राहिली आहे. याच परंपरेतून राज्य शासनाने राजे अम्ब्रिशराव यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. फारसा राजकीय अनुभव नसताना, पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले असताना एका युवा राज्यमंत्र्यावर गडचिरोलीसारख्या विकास कामांसाठी आव्हानात्मक व महत्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राजेंकडे देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपनेही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या असणार. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा राजेंनी किती प्रमाणात पूर्ण केल्या हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण गडचिरोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या अपेक्षांची मात्र पूर्तता होताना दिसत नाही.
गेल्या अडीच वर्षात राजेंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू नागरिकांनी पाहीले. त्यांचे वागणे-बोलणे, नागरिकांशी ठेवल्या जाणाऱ्या संपर्कापासून तर झोपेतून उठण्यापर्यंत अनेक किस्से सांगितले जातात. अर्थात त्यात किती सत्यता आहे हे माहित नाही, पण ज्या गोष्टी सत्य नसतील आणि त्याची जर चर्चा होत असेल तर वेळीच त्या चर्चांना पूर्णविराम देणे गरजेचे आहे. अम्ब्रिशराव ‘राजे’ असले तरी ते आता लोकांनी निवडून दिलेले ‘लोकप्रतिनिधी’ आहेत. त्यांच्याच पक्षाचे प्रधानमंत्री तर स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात. राजेंना जिल्हावासीय ‘सेवका’च्या भूमिकेतून पाहात नसले तरी आपला ‘प्रतिनिधी’ या नात्याने त्यांच्याकडून जिल्हावासीयांच्या निश्चितच अनेक अपेक्षा आहेत. या जिल्ह्याच्या विकासकामांची भूक मोठी आहे. ती भागविण्यासोबतच नागरिकांच्या सुख-दु:खात त्यांनी सहभागी झाले पाहीजे ही नागरिकांची अपेक्षा आहे.
यापूर्वी गडचिरोलीपासून हजार किलोमीटरवर राहणाऱ्या आर.आर. पाटलांनी एक आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत:हून स्वीकारले आणि गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात कधीही न झालेली कितीतरी कामे मार्गी लावली. त्यांची कारकिर्द आजही लोक एक ‘माईलस्टोन’ म्हणून आठवतात. जी लोकप्रियता आबांनी या अपरिचित जिल्ह्यात मिळविली तीच लोकप्रियता राजेंना त्यांच्या आपल्या जिल्ह्यात का मिळू नये? याचा कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे.
आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे उदाहरण सर्वांच्या नजरेसमोर आहे. जी बैठक दर चार महिन्यांनी होणे अपेक्षित आहे ती गेल्या १० महिन्यांपासून झालेली नाही. समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय ती बैठक होत नाही. १० महिन्यातील काही काळ निवडणुकींच्या आचारसंहितेत गेल्यामुळे ही बैठक लांबली असली तरी आता कोणतीच आचारसंहिता नाही. पण तरीही बैठकीचा थांगपत्ता नाही.
राजेंना या जिल्ह्याबद्दल जिव्हाळा नाही किंवा विकासाची तळमळ नाही, असे समजण्याचे कारण नाही. पण त्यांना आपला ‘अॅटीट्युड’ बदलावा लागेल. अगदी आर.आर.पाटील यांच्याप्रमाणे त्यांनी ग्रामीण भागात मोटरसायकलवरून फेरफटका मारणे अपेक्षित नसले तरी ‘राजे’ आणि ‘सामान्य प्रजा’ यांच्यातील अंतर कमी व्हावे, एवढी रास्त अपेक्षा मात्र निश्चित आहे.