‘यंगेस्ट लेडी ड्रायव्हर’च्या बहुमानाने किरण सन्मानित; दुर्गम भागांत चालविते प्रवासी वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 07:45 AM2021-05-28T07:45:00+5:302021-05-28T07:45:02+5:30
Gadchiroli news सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात प्रवासी जीप चालवून आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या किरण कुरमावार या युवतीला दिल्लीच्या संस्थेने ‘यंगेस्ट लेडी ड्रायव्हर’ हा बहुमान देऊन सन्मानित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या पूर्वटोकावरील सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात प्रवासी जीप चालवून आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या किरण कुरमावार या युवतीला दिल्लीच्या संस्थेने ‘यंगेस्ट लेडी ड्रायव्हर’ हा बहुमान देऊन सन्मानित केले. कोरोनाच्या स्थितीमुळे जाहीर कार्यक्रम न करता प्रमाणपत्र आणि पदक किरणला घरपोच पाठविण्यात आले.
एमए (अर्थशास्त्र) शिकूनही दुर्गम भागात प्रवासी टॅक्सी चालविणाऱ्या किरणची कहाणी सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला होता नंतर विविध राज्यातील संस्थांनी तिचा सत्कार केला. आता त्यात या नवीन बहुमानाची भर पडली आहे. विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स या दिल्लीतील संस्थेकडून सन्मान केला जातो. त्यांनी किरणला ‘प्रवासी वाहन चालविणारी सर्वांत तरुण महिला चालक’ असा बहुमान दिला आहे.