मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्वाक्षरी केली, तरीही किरणची शिष्यवृत्ती लालफितीत अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:32 PM2023-08-28T12:32:20+5:302023-08-28T12:33:28+5:30
महिना उलटला, इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जाणार 'लेडी ड्रायव्हर'
गडचिराेली : सिराेंचा तालुक्यातील रेगुंठा येथील किरण कुर्मा या विद्यार्थिनीला लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीची गरज आहे. २७ जुलै राेजी किरणने विधान भवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी किरणच्या प्रस्तावावर तत्काळ स्वाक्षरी केली. तसेच, तिला तत्काळ स्काॅलरशिप मंजूर करावी, असा अभिप्राय लिहिला. याला आता महिनाभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनपर्यंत स्काॅलरशिपची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तसेच, १८ सप्टेंबरपासून काॅलेज सुरू हाेणार असल्याने किरणचा जीव टांगणीला लागला आहे.
रेगुंठा येथील किरण कुर्मा हिने रेंगुंठा ते सिराेंचा दरम्यान काळीपिवळी चालवून वडिलांच्या खांद्यावरील संसाराचा भार कमी केला. तसेच, या कालावधीत तिने उच्च शिक्षणही घेतले. आता तिने लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ लिडस् येथे इंटरनॅशनल मार्केटिंग ॲन्ड मॅनेजमेंट या एक वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिने दीड लाख रुपये शुल्क भरले आहे. सदर शुल्क भरण्यासाठी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी किरणला मदत केली. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची गरज आहे.
शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तयार करून किरणने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २७ जुलै राेजी विधान भवनात भेट घेतली. गडचिराेली जिल्ह्यातील विद्यार्थिनी म्हटल्यावर तिची आस्थेने विचारपूस केली. तसेच, प्रस्तावावर स्वाक्षरी करून शिष्यवृत्ती तत्काळ मंजूर करावी, असा अभिप्राय लिहिला. एवढेच नाही तर समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना फाेन करून निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार किरणचा प्रस्ताव पुणे येथील समाजकल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात पाठविण्यात आला. सदर प्रस्ताव मंत्रालयात पाेहाेचला आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून ताे तेथेच अडकून आहे. त्यामुळे स्काॅलरशिप अजूनही मंजूर झाली नाही. मुख्यंमत्र्यांनी तत्परता दाखविली मात्र मंत्रालयातील लालफितीत प्रस्ताव अडकला आहे.
किरणचे हाेणार शैक्षणिक नुकसान
किरणने ज्या विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. तेथील अभ्यासक्रम १८ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहे. शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याने किरणने व्हिसा काढणे व पुढील प्रक्रिया पूर्ण केली नाही. शिष्यवृत्ती मिळण्यास उशीर हाेत असल्याने तिचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची भीती आहे. किरणला सुमारे ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. शिष्यवृत्ती न मिळाल्यास शिक्षण घेणे कठीण हाेणार आहे.