किष्टापूर येथील शाळा सहा दिवसांपासून बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:48 AM2018-10-24T00:48:51+5:302018-10-24T00:49:10+5:30
अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकच शिक्षक आहे. सदर शिक्षक सुटीवर गेल्याने येथील शाळा मागील सहा दिवसांपासून बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
किष्टापूर : अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकच शिक्षक आहे. सदर शिक्षक सुटीवर गेल्याने येथील शाळा मागील सहा दिवसांपासून बंद आहे.
शिक्षक सुटीवर गेल्यास शाळा बंद राहू नये, यासाठी दुसऱ्या शिक्षकाला पाठविण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांची आहे. विशेष म्हणजे गावातील नागरिकांनी सुद्धा दुसरा शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रप्रमुखांकडे केली होती. मात्र केंद्रप्रमुखांनी शिक्षक उपलब्ध करून दिला नाही. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. मात्र पाचही वर्गांसाठी एकच शिक्षक आहे. अध्यापन करण्याबरोबरच कार्यालयीन कामे सुद्धा करावी लागतात. त्यामुळे बऱ्याचवेळा अध्यापनाकडे शिक्षकाचे दुर्लक्ष होते. पाचही वर्ग एकाच ठिकाणी भरविले जातात. कोणत्या विद्यार्थी काय शिकत आहे, हे कळण्यास मार्ग नाही.
सहा दिवसांपासून शिक्षक येत नसल्याने शाळा बंद पडली आहे. सकाळी १० वाजता विद्यार्थी शाळेत जातात. दुपारी १२ वाजेपर्यंत दुसऱ्या शाळेचा एखादा शिक्षक येईल, याची प्रतीक्षा करतात. मात्र शिक्षक येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते घराकडे परत येत आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावातील पालकांनी व नागरिकांनी दिला आहे.