चाकूने भोसकून युवकाचा खून
By admin | Published: November 13, 2016 02:02 AM2016-11-13T02:02:02+5:302016-11-13T02:02:02+5:30
रस्त्यावर ठेवलेल्या मोटारसायकलवरुन वाद झाल्याने बैलगाडीस्वाराने एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची
छल्लेवाडा येथील घटना : बंडी बाजूला करण्यास सांगितले
कमलापूर : रस्त्यावर ठेवलेल्या मोटारसायकलवरुन वाद झाल्याने बैलगाडीस्वाराने एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास छल्लेवाडा येथे घडली. हरिनाथ समय्या दुर्गे (२१)असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी सुधाकर राजन्ना दुर्गे याने रेपनपल्ली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
शुक्रवारी रात्री सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे हे दोघे भाऊ छल्लेवाडा गावातील अंतर्गत रस्त्याने बैलगाडी घेऊन जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला हरिनाथ दुर्गे याची मोटारसायकल उभी होती. बैलगाडीमुळे मोटारसायकल क्षतीग्रस्त होईल, असे हरिनाथने म्हणताच दोघांमध्ये वाद झाला. पुढे वाद विकोपाला गेला आणि सुधाकर दुर्गे व त्याचा भाऊ बसवय्या दुर्गे यांनी हरिनाथ दुर्गे यास मारहाण केली. काही क्षणातच सुधाकरने हरिनाथवर चाकूने वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
शिवाय या घटनेत हरिनाथच्या मदतीला गेलेला त्याचा भाऊ सुनील दुर्गे हाही गंभीर जखमी झाला असून, त्याला गडचिरोलीला हलविण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर आरोपी सुधाकर दुर्गे याने रेपनपल्ली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक धुरपडे घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे छल्लेवाडा गावात दिवसभर चर्चा होती. गावातील शुल्लक बाबीवरून ही दुर्दैवी घटना घडल्याचे ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)