नक्षलग्रस्त गावात ज्ञान‘साधना’

By admin | Published: August 10, 2015 12:56 AM2015-08-10T00:56:07+5:302015-08-10T00:56:07+5:30

नक्षली दहशतीत शिक्षणाचे धडे गिरविणे आदिवासी समाजाचे धैर्य विरळच. आदिवासी व पिढ्यान्पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाज घटकाला ...

Knowledge in the Naxal-affected village | नक्षलग्रस्त गावात ज्ञान‘साधना’

नक्षलग्रस्त गावात ज्ञान‘साधना’

Next

नेलगुंडात विद्यालय सुरू : लोकबिरादरी प्रकल्पाच्या शैक्षणिक उपक्रमात पडली भर
गडचिरोली : नक्षली दहशतीत शिक्षणाचे धडे गिरविणे आदिवासी समाजाचे धैर्य विरळच. आदिवासी व पिढ्यान्पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाज घटकाला आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूने लोकबिरादरी प्रकल्पाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत महारोगी सेवा समिती वरोराच्या वतीने भामरागड तालुका मुख्यालयापासून २७ किमी अंतरावरील नेलगुंडा या नक्षलग्रस्त गावात ३ आॅगस्ट २०१५ पासून सीबीएसई पॅटर्नचे साधना विद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाच्या शैक्षणिक उपक्रमात आणखी भर पडली आहे.
भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे १९७३ मध्ये कर्मयोगी बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. त्यानंतर आजतागायत या भागात आमटे कुटुंबीयांनी आदिवासींप्रति सुरू असलेले सेवाव्रत अविरत ठेवले आहे. नक्षलग्रस्त भागातील नेलगुंडा या अतिसंवेदनशील गावात साधना विद्यालयाची ५ मे २०१५ रोजी स्थापना करणे हा एक लोकबिरादरी प्रकल्पाचा शैक्षणिक उपक्रमच आहे.
दुर्गम गावातील बालके उच्च दर्जाच्या शिक्षणापासून वंचित राहू नयेत या दृष्टीने नेलगुंडा येथे साधना विद्यालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे मिळावे याकरिता प्रारंभी ओपन शेड टाकून वर्ग खोल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्गांमध्येच विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. गावात नवीन विद्यालय निर्माण झाल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साह प्रचंड प्रमाणात ओसंडून वाहत होता. दऱ्याखोऱ्यात व नक्षली दहशतीत जीवन व्यतित करणाऱ्या आदिवासी व वंचित समाज घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मूळ हेतू या दृष्टीने पूर्णत्वास आला आहे. त्यामुळे दुर्गम भागात ज्ञानगंगा पोहोचण्यास मदत झाली आहे. शाळा व परिसर प्रकाशमान करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार तसेच मूलभूत सोयी- सुविधा विद्यार्थ्यांकरिता निर्माण केल्या जाणार आहेत. शाळेच्या शुभारंभप्रसंगी समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे व आमटे परिवारातील सदस्य व गावातील पालक उपस्थित होते. आदिवासी बांधवांचे प्रेम व विश्वास या माध्यमातून दुर्गम भागात ज्ञानगंगा पोहोचविण्याचे स्वप्न साकार झाले, अशी प्रतिक्रिया अनिकेत आमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)
पावसात शेड व ऐरव्ही झाडाखाली धडे
नेलगुंडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे घेता यावे याकरिता शेड उभारून शाळेची इमारत निर्माण करण्यात आली आहे. परंतु सद्य:स्थितीत पाऊस येत असला तर शेडखाली, नसला तर झाडाखाली विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजले जाणार आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात बालकांचा उत्साह अध्ययनात ओसंडून वाहू शकेल यात तीळमात्र शंका नाही. दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेलगुंडा गावात विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक धडे मिळणार याचा उत्साह गावकऱ्यांंच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्यामुळेच शैक्षणिक प्रक्रिया गतिमान होण्यास गावकऱ्यांचाही हातभार लागत आहे.
५२ विद्यार्थ्यांचा प्रवेश
नेलगुंडा येथील नवीन साधना विद्यालयात बालवाडी, पहिली व दुसरी या तीन वर्गात ५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत असलेली जाणीव दिसून येते. वर्गातील प्रवेश संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Knowledge in the Naxal-affected village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.