सात वर्षानंतर उजळणार कोहकापरी गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:52 PM2017-12-26T23:52:19+5:302017-12-26T23:53:07+5:30
दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड (गडचिरोली) : दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.
आठ वर्षांपूर्वी पल्ली गावात वीज पुरवठा करण्यासाठी कोहकापरी या गावातूनच तारांची जोडणी करून वीज पुरवठा घेतला होता. त्या पल्ली गावात अजूनही वीज पुरवठा सुरू आहे, मात्र सात वर्षांपूर्वी कोहकापरी गावातील वीज तारांवर पावसाळ्यात मोठे झाड पडले. तेव्हापासून वीज पुरवठा खंडित झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा महावितरण कंपनीकडे तक्रार केली. मात्र गावात एकही वीज ग्राहक नसल्याने वीज पुरवठा सुरू करण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे मागील सात वर्षांपासून सदर गाव अंधाराचा सामना करीत आहे.
ही बाब ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दीपक दळवी यांच्या लक्षात आली. त्यांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गावात ग्राहक असण्याची अट वीज कंपनीने टाकली. पोलिसांनी ग्रामसभा घेऊन गावकºयांना वीज जोडणी घेण्यास सांगितले. त्यानुसार गावातील नागरिकही तयार झाले. त्यानंतर पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला. आता वीज कंपनीने विजेचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. गावात नवीन खांब बसविले जात आहेत. त्याचबरोबर नवीन ट्रान्सफार्मरही लावले जाणार आहे. त्यामुळे लवकरच या गावातील रस्ते आणि घरेही विजेच्या प्रकाशाने उजाडणार आहे.
केहकापरीला जाण्यासाठी रस्ता नाही
पोलिसांच्या मदतीने केहकापरी गावाचा वीज पुरवठा सात वर्षानंतर सुरू होणार आहे, मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटेचा आधार घेत गाव गाठावे लागते. घनदाट जंगलात असलेले सदर गाव मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे विकासासाठी आलेला निधी जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.