कोनसरीचा लोहखनिज प्रकल्प गुंडाळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:05 AM2019-06-07T00:05:20+5:302019-06-07T00:06:00+5:30
मुबलक प्रमाणात लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे हे काम बंद आहे. या परिस्थितीला वैतागून लॉयड्स मेटल्स कंपनी हे काम गुंडाळण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुबलक प्रमाणात लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे हे काम बंद आहे. या परिस्थितीला वैतागून लॉयड्स मेटल्स कंपनी हे काम गुंडाळण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या रुपात हजारो बेरोजगारांनी पाहिलेले रोजगाराचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या पहाडाच्या पोटात मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. त्या कच्च्या खनिजाचे शुद्धीकरण करून शुद्ध लोह काढण्याचा प्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे प्रस्तावित आहे. दोन वर्षापूर्वी घाईघाईने मुख्यमंत्र्यांनी येऊन त्या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. नंतर शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यापासून तर एमआयडीसीकडून ती जागा लॉयड्स मेटल्स कंपनीला हस्तांतरित करण्यापर्यंतच्या प्रक्रियेसाठी सव्वा वर्ष निघून गेले. परंतू नंतरही हे काम ठप्पच आहे.
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार अनेक उद्योजकांना विविध प्रकारे प्रोत्साहन आणि सवलती देत असताना गडचिरोलीत मात्र उलटे चित्र तयार झाले आहे. लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत कोणाकडूनच सहकार्य मिळत नसल्यामुळे हे काम पुढे चालू ठेवणे कठीण असून त्यामुळे कंपनी आपले काम गुंडाळण्याचा विचार करीत असल्याचे सूत्रांकडून समजते. दिवसाला एक हजार टन लोहदगडाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असणाºया कोनसरीच्या प्रकल्पाला तेवढा कच्चा माल नियमितपणे मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प तोट्यात जाऊ शकतो. म्हणूनच कोनसरीतील प्रकल्प उभारणीच्या कामाला कंपनीने अद्याप सुरूवात केली नसल्याचे सांगितले जात आहे.
लोकप्रतिनिधींना बसणार फटका !
लोहखाणीतील कच्चा माल काढण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळत होते. ते काम पाच महिन्यांपासून बंदच आहे. यानंतर कोनसरीतील कारखान्यात कुशल कामगारांना नियमित नोकरी लागण्याचे स्वप्नही आता भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबत बेरोजगार युवकांना ट्रकमालक बनविण्याचे स्वप्नही भंगणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रस्त्याचे कामही ठप्पच
गेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरजागडमधील लोहखनिज लॉयड्स मेटल्स कंपनीच्या घुग्गुस येथील लोहप्रकल्पात नेले जात होते. परंतू एका अपघाताचे निमित्त झाले आणि लोहखनिजाची वाहतूक बंद झाली. ज्या मार्गाने लोहखनिजाचे ट्रक जातात त्या मार्गाचे रूंदीकरणाचे काम तातडीने करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. त्या कामाची निविदा प्रक्रियाही आधीच झाली होती. परंतू आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या कंपनीने गेल्या सहा महिन्यात त्यासाठी लागणारी पुढची प्रक्रियाच (बँक सिक्युरिटी) केली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया अर्धवट स्थितीत पडून असून सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाला आहे.
नक्षलवादी मानसिकेचा विजय
विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण देण्यासाठी पोलीस महासंचालकांनी सुरजागड पहाडावर स्वतंत्र उपपोलीस स्टेशन मंजूर केले आहे. पण अलिकडे वाढलेल्या नक्षलवादी कारवायांमुळे पोलीस लोहखनिजाच्या कामासाठी किंवा वाहतुकीसाठी संरक्षण देण्यास तयार नाहीत. पोलीस हिमत दाखवून कोणतीही ‘रिस्क’ घेण्यास तयार नसल्यामुळे हा पोलिसांचा पराजय आणि नक्षलवादी मानसिकता ठेवणाऱ्यांचा विजय असल्याचेही बोलले जात आहे. याचा सर्वाधिक फटका बेरोजगार युवकांना बसणार आहे.