Gadchiroli | कोनसरी लोह प्रकल्प 'गेम चेंजर' ठरेल; एप्रिलपर्यंत सुरू होणार पाहिला टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 02:37 PM2022-10-01T14:37:14+5:302022-10-01T14:46:28+5:30
१८ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित
गडचिराेली : एटापल्ली तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील कच्चे लोखंड कोनसरी भागात प्रक्रिया प्रकल्प उभारुन पोलाद निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाकरता १८ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून याचा पहिला टप्पा एप्रिलपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार नव्याने सत्तारुढ झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले असून यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
गडचिरोली: कोनसरी लोह प्रकल्प 'गेम चेंजर' ठरेल. एप्रिलपर्यंत याचा पाहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री @Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी दिली.#Gadchiroli#DevendraFadnavispic.twitter.com/INkgKQYgvR
— Lokmat (@lokmat) October 1, 2022
सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील कच्चे लोखंड कोनसरी भागात प्रक्रिया प्रकल्प उभारून पोलाद निर्मिती केली जाणार आहे. या लोह खनिज प्रक्रिया प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार व विकासाला चालना मिळेल. जिल्ह्यासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. यासह मेडीगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या शेतजमिनीचे अधिग्रहण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गडचिरोलीत घेतलेल्या पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.