कोपेला नाल्यावरून करावा लागतो जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:44 PM2018-08-13T22:44:18+5:302018-08-13T22:44:44+5:30
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाल्याच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाल्याच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.
झिंगानूर परिसरातील बहुतांश नाले जंगलातून वाहतात. या परिसरात पावसाचे प्रमाण सुद्धा अधिक आहे. त्यामुळे जुलैपासून ते जानेवारीपर्यंत येथील नाल्यांमध्ये पाणी राहते. कोपेला गावापासून ८०० मीटर अंतरावर मोठा नाला आहे. या नाल्यावर रपटा किंवा पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे नाल्याच्या पाण्यातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्यात अचानक या नाल्याच्या पाणीपातळीत वाढ होते. त्यामुळे वाहन किंवा पादचारी व्यक्तीलाही नाला ओलांडणे कठीण होते. नागरिकांना नाल्याचे पाणी होत पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने वाहनधारक व नागरिक तासन्तास नाल्याचे पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करतात.
शनिवारी झिंगानूर परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोपेला नाल्याच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यामुळे गुमालकोंडा, मुक्तापूर, मुकीडीगुट्टा, सुंकारेली, टेकडामोटला, बालामुत्तेमपल्ली, जंगलपल्ली आदी गावांकडे जाणाऱ्या नागरिकांचे मार्ग बंद झाले. अनेक नागरिक तालुका मुख्यालयाला जाणार होते. मात्र नाल्याचे पाणी कमी होतपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. नाल्याचे पाणी अचानक वाढल्याने पाणीपातळीत वाढ होऊन नागरिकांची गैरसोय होण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत.
पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
कोपेला नाला अत्यंत खोल आहे. अचानक या नाल्याच्या पाणीपातळीत वाढ होते. परिणामी नागरिकांना पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागते. या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे केली आहे. मात्र अजूनपर्यंत पुलाचे बांधकाम झाले नाही. पावसाळ्यात या पुलामुळे किमान १० ते १५ वेळा वाहतूक ठप्प होते.