कोरची तालुका झाला कसायांचा अड्डा
By admin | Published: November 4, 2014 10:40 PM2014-11-04T22:40:41+5:302014-11-04T22:40:41+5:30
तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जात असल्याने कोरची तालुक्यातील पशुधन झपाट्याने घटत आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जात असल्याने कोरची तालुक्यातील पशुधन झपाट्याने घटत आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
दिवसेंदिवस चराईचे क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग जनावरे पाळण्यास तयार नाही. शेतकऱ्यापेक्षा कसायी अधिक किंमत देत असल्याने शेतकरीसुद्धा आपली जनावरे कसायालाच विकत आहेत. छत्तीसगड व हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनी कोरची तालुक्यातील बोरी, घुघगा, भीमपूर, कोटगूल, गणेशपूर, बेतकाठी, बोटेकसा, कोटरा, बेलगावघाट, कोसमी, कुरखेडा तालुक्यातील पुराडा, रामगड, गेवर्धा, देसाईगंज तालुक्यातील आमगाव, शंकरपूर, आरमोरी तालुक्यातील मुरमाडी, मुरूमगाव, सावरगाव या गावांमध्ये दलाल नेमले आहेत. सदर दलाल जनावरे खरेदी केल्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास गावातून जनावरे नेतात. गावाच्या जवळच ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये कोंडून नागपूर येथील कत्तलखान्यात सदर जनावरे पाठविली जातात. क्षमतेपेक्षा अधिक जनावरे ट्रकमध्ये कोंबून भरली जातात. त्यामुळे जनावरांना श्वास घेणेही अडचणीचे होते. काही जनावरांचा वाहतुकीदरम्यानच मृत्यू होतो.
कोरची तालुका जंगलव्याप्त आहे. त्यामुळे जनावरांना चराईसाठी मुबलक जागा होती. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पशुधन पाळत होते. मात्र दिवसेंदिवस जंगलाखालील क्षेत्र कमी होत चालले आहे. त्याचबरोबर वनविभागाने जंगलात जनावरांना चरण्यास बंदी घातली असल्याने जनावरे चारावी कुठे असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश पशुपालक गोधन कसायाला विकत आहेत. परिणामी आजपर्यंत जनावरांनी भरून दिसणारे गोठे रिकामे व्हायला लागले आहेत.