कोरचीचा जांभूळ नागपूर, चंद्रपूरसह मोठया शहराच्या बाजारपेठेत
By दिलीप दहेलकर | Published: June 19, 2023 03:55 PM2023-06-19T15:55:13+5:302023-06-19T15:56:27+5:30
विदर्भात पसंती : व्यापाऱ्यांसह जूस कंपन्यांकडून वाढली डिमांड
गडचिरोली : कोरची तालुक्याच्या जंगल परिसरातून दरवर्षी मोठया प्रमाणात निघणारे व औषधी गुणधर्म असलेले तुरट गोड चवीचे जांभूळ फळ विदर्भाच्या नागपूर, चंद्रपूरासह मोठया शहराच्या बाजारपेठेत पोहोचत असून यंदा शहरी भागातील व्यापाऱ्यांसह जूस कंपन्यांकडून जांभळाची मागणी वाढली आहे. विदर्भाच्या बाजारपेठेत प्रसिध्द असलेल्या जांभळाची निर्यात चारचाकी वाहनाने कोरची येथुन मोठया शहराकडे होत आहे.
शरीराच्या आरोग्यासाठी जांभूळ हे फळ खूप गुणकारी आहे. यंदा मे महिन्यामध्ये आलेल्या पंधरा दिवस अवकाळी पावसामुळे जून ते जुलै महिन्यात वीस ते पंचवीस दिवस निघणाऱ्या जांभळाच्या उत्पन्नात खूप मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील अनेक झाडांतील जांभूळ झाडावरच सुकल्यामुळे गळून झाडाखाली पडल्याने जांभळाच्या उत्पन्नात यंदा थाेडीसी घट झाली आहे. त्यामुळे जांभळापासून उत्पन्न घेणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. याउलट विदर्भाच्या शहरातील बाजारपेठेत व्यापारी, ग्राहक व कंपन्यांकडून जांभळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे जांभूळ व्यवसाय करणारे व्यापारी यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावा-गावात जाऊन जांभूळ खरेदीसाठी फिरताना दिसत आहेत.
दररोज १० वाहने रवाना
कोरची तालुक्यात जांभळाचा हंगाम सुरू असून दररोज या तालुक्यातून आठ ते दहा पिकअप वाहने जांभुळ भरून नागपूर व इतर शहराकडे रवाना होत आहेत.
असा आहे दर
दरवर्षी पेक्षा यावर्षी जांभूळ कमी प्रमाणात निघालेले आहे. दरवर्षी ७०० ते ८०० रुपये प्रति कॅरेट प्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांकडून खरेदी केली जात होती. परंतु यावर्षी हजार ते बाराशे रुपये प्रति कॅरेटने व्यापाऱ्यांना खरेदी करावी लागत आहे. जांभूळ दर्जा बघून शहरातील बाजारपेठात व ज्युस कंपन्यांमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये प्रति कॅरेट प्रमाणे विकले जात आहे.
विविध पदार्थ होतात तयार
जांभळापासून जेली, सिरप, स्क्चँश, आईस्क्रीम, चॉकलेट असे विविध प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. तसेच आरोग्यासाठी गुणकारी म्हणून जांभूळ रसाच्या तसेच बियाच्या भुकटीमध्ये औषधी गुणधर्म आहे. जांभूळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेह रोगावर औषध आहे.