कोरेगाव शाळेत आठ वर्गांसाठी दोनच शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:42 AM2021-08-17T04:42:21+5:302021-08-17T04:42:21+5:30
आरमाेरी पंचायत समिती अंतर्गतच्या पिसेवडधा केंद्रातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ वर्ग आहेत. या ठिकाणी ६४ विद्यार्थी शिक्षण घेत ...
आरमाेरी पंचायत समिती अंतर्गतच्या पिसेवडधा केंद्रातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ वर्ग आहेत. या ठिकाणी ६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चार शिक्षकांची नियुक्ती केलेली हाेती. येथील पदवीधर शिक्षक एस. आर. बिडवाईकर हे जुलै २०१८ पासून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत. त्यांचे मासिक वेतन जिल्हा परिषद शाळा कोरेगाव आस्थापनेवरून काढण्यात येत आहे. दुसरे शिक्षक पी. एस. हलामी हे अप्रशिक्षित असल्याने त्यांची सेवा २७ मे २०२० ला संपुष्टात आलेली आहे.
आता सध्या दोनच शिक्षक उपलब्ध असून, एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांना अध्यापनाबराेबरच प्रशासकीय कामेही करावी लागतात. त्यामुळे ते पूर्ण वेळ अध्यापनाकडे लक्ष देऊ शकत नाही. काही शिक्षकांनी आयुक्तांमार्फत बदली करून घेतली. हे शिक्षक आरमोरी तालुक्यामध्ये बदली रुजू झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन स्वतःची बदली करून घेतल्यामुळे ते तालुक्यातील शेवटच्या ठिकाणी शाळेवर रुजू होण्यास तयार नाहीत. जिथे शिक्षकांची गरज नाही तिथेच अतिरिक्त शिक्षकांची गर्दी करण्यात आलेली आहे आणि आवश्यक ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्यात आलेले आहेत. एस. आर. बीड बिडवाईकर यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांची पदस्थापना पूर्ववत शाळेत करण्यात यावी, तसेच पी. एस. हलामी यांच्या जागी एका नवीन शिक्षकाची नियुक्ती तत्काळ करण्यात यावी, अन्यथा शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बालाजी गेडाम व शालेय व्यवस्थापन समितीने दिलेला आहे.