परसेवाडा धबधबा विकासापासून कोसोदूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:37+5:302021-04-12T04:34:37+5:30
जिमलगट्टा : गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने समृद्ध मानल्या जाताे. जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक आकर्षक स्थळे आहेत. ...
जिमलगट्टा : गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने समृद्ध मानल्या जाताे. जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक आकर्षक स्थळे आहेत. असे असूनही जिल्ह्यात पर्यटनस्थळ घोषित करून विकास केला जात नाही. असेच एक ठिकाण सिरोंचा तालुक्यातील जिमलगट्टापासून २५ किमी अंतरावर बेजूरूपली - परसेवाडा रोडवर पश्चिमेस घनदाट जंगलात दोन पहाडीच्या मधात धबधबा असून हे ठिकाण सध्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. मात्र, शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हा धबधबा विकासापासून कोसोदूर आहे.
परिसरातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देताना दिसून येत आहेत. बाराही महिने या धबधब्यात पाणी असते. रात्रीच्या शांत वातावरणात घनदाट जंगलातील या धबधब्याचा खूप दूरपर्यंत आवाज येतो. सदर ठिकाण सिरोंचा वनविभाग अंतर्गत येते. याठिकाणी जायला रस्ता नाही. बेजूरपल्लीनंतर आदिवासींचे लींगो - जंगो पेंटन्ना नावाचे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी वाहने पार्क करून समोर या स्थळापासून एक किमी अंतरावर दाट जंगलातून पायवाटेने चालत जावे लागते. जाताना दोन पहाडीच्या मधातून रस्ता असून लहान लहान चार नाले आहेत. रस्त्यावरील या नाल्याच्या पाण्यातून थंडगार वातावरणात पर्यटकांना जाताना त्यांचा आनंद वेगळाच असतो. हा रस्ता धबधब्याच्या वरच्या बाजूपर्यंत जातो. तिथे पोहोचल्यानंतर पर्यटक एक किमी पायी आलेले थकवासुद्धा विसरून जातात. यानंतर धबधब्याखाली पर्यटक दिवसभर आनंद घेतात. याठिकाणी पर्यटक आपापल्या सोयीने डबे किंवा सीधा नेऊन स्वयंपाक करून खाण्याची सोय करून घेतात. हे स्थळ सिरोंचा वनविभागातील वनपरिक्षेत्रात येते. वनविभाग सिरोंचाकडून धबधबा पर्यटनक्षेत्राचा विकास आराखडा तयार करून धबधब्यापर्यंत रस्ता, पर्यटकांना शेड व इतर सुविधा केल्यास पर्यटनाला वाव मिळेल. पावसाळा व हिवाळ्यात येथील परिसर हिरवागार राहत असल्याने साैंदर्य अधिकच खुलून दिसते.