कोटगूलची आश्रमशाळा अजूनही विद्यार्थ्यांनाविना ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:11 PM2019-07-22T23:11:18+5:302019-07-22T23:11:48+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही तिकडे धाव घेतली.
लिकेश अंबादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही तिकडे धाव घेतली. पण येथील विद्यार्थी सोमवारीसुद्धा आश्रमशाळेत परतले नव्हते. सदर आश्रमशाळेत देवपूजा केल्यानंतरच आपल्या पाल्यांना पाठविणार, असा निर्धार पालकांनी केला आहे.
कोटगूल आश्रमशाळेत १९ जुलै रोजी वसतिगृहात निवासी राहणारी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी पिंटी धनेश्री कुरचामी रा. टेकामेटा हिची प्रकृती सर्वप्रथम बिघडली. ती सारखी रडत होती. त्यामुळे तिला गडचिरोलीच्या रूग्णालयात हलविण्यात आले. तिला नेमके काय झाले हे कळतच नसल्याने आश्रमशाळेत भूत-पिशाच्च तर नाही ना? अशी भिती आश्रमशाळेतील मुलामुलींमध्ये निर्माण झाली. दुसºया दिवशी २० जुलैला पुन्हा एका मुलीने रडणे, हातपाय इकडे तिकडे मारण्यास सुरूवात केली. आठवीची विद्यार्थिनी अनुकला ताराम व अंकिता गेंदलाल टेकाम या मुलींचीही प्रकृती बिघडली. सदर मुलीचे हे विचित्र वागणे पाहून दुसºया मुलींनीही तशाच प्रकारची कृती करण्यास सुरूवात केली. हा प्रकार पाहून भुताटकीची बाधा झाली, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटू लागला. त्यामुळे पालकांच्या आग्रहावरून विद्यार्थ्यांना शनिवारी त्यांच्या घरी सोडण्यात आले.
त्यानंतर सोमवारी २२ जुलै रोजी सदर आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भुरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष उद्धव डांगे, विलास निंबोरकर, विठ्ठल कोठारे, सुधाकर दुधबावरे व सहायक प्रकल्प अधिकारी आर. के. लांडे यांना शाळेच्या ठिकाणी बोलावून घेतले. गावातील नागरिक व टिपागड विद्यालयातील ३० ते ४० विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत बोलावून अंधश्रध्दा निर्मूलन जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांमधील अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पालकांचे मनपरिवर्तन झाले नाही. २२ ते २५ गावातील विद्यार्थी कोटगूलच्या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. १८ गावांचा मिळून एक पुजारी आहे. सदर पुजाºयाला आश्रमशाळेत बोलावून देवपूजा करू, त्यानंतर आम्ही आमच्या पाल्यांना आश्रमशाळेत पाठवू किंवा आणून देऊ, असे पालकांनी शालेय प्रशासनाला सांगितले.
अन् विद्यार्थ्यांना पालकांनी घरी नेले
कोटगूलच्या या आश्रमशाळेत एकूण २५९ विद्यार्थी दाखल आहेत. सदर घटनेच्या दिवशी २११ विद्यार्थी उपस्थित होते. सदर प्रकार विशेष करून मुलींच्या वसतिगृहात घडला. विद्यार्थिनींनी ही माहिती अधीक्षक व अधिक्षिका तसेच मुख्याध्यापकांना दिली. त्यानंतर येथील मुख्याध्यापकाने ही माहिती प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाºयांना कळविली. तसेच गावातील प्रतिष्ठीत लोकांना बोलावून सदर प्रकरणाबाबत विचारविनीमय करण्यात आला.
गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यू. के. कोडापे व एस. एम. दबा यांनी सदर आश्रमशाळा गाठून तेथील पालकांशी चर्चा केली. मात्र काय झाले हे सांगण्यासाठी अधिकाºयांसमोर विद्यार्थ्यांना नेणार नाही, असे पालकांनी सांगितले. दरम्यान अधिकारी गडचिरोलीला निघून गेल्यावर पालकांनी विद्यार्थ्यांना घरी सोडण्याबाबत मुख्याध्यापकांवर दबाव टाकला. मुख्याध्यापक एस.डी.भुरे यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास टॅक्सी करून शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना घरी पोहचवून दिले.
आश्रमशाळेतील कथित भुताटकीच्या प्रकरणानंतर गावातील नागरिक व पालकांची बैठक घेतली. त्यात पालकांनी आम्ही आमच्या मुलामुलींना दोन ते तीन दिवसात आश्रमशाळा व वसतिगृहात परत पाठविणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमधील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोटगूल हे गाव अतिसंवेदनशील भागात असल्यामुळे ग्रामस्थ व पालकांसोबत मिळून आश्रमशाळेतील मुलामुलींना सदर शाळेत परत आणता येईल.
- आर. के. लाडे,
सहा. प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी वि.प्र., गडचिरोली