कुणबी समाजाने एकजूट व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:20 PM2018-01-28T22:20:49+5:302018-01-28T22:20:59+5:30
कुणबी समाज पोटजातींमध्ये विखुरला आहे. त्यामुळे या समाजातील अनेक समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. विखुरलेल्या या समाजाने एकजूट झाल्यास समस्या सुटू शकतील. त्यामुळे कुणबी समाजाने एकजूट व्हावे, असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : कुणबी समाज पोटजातींमध्ये विखुरला आहे. त्यामुळे या समाजातील अनेक समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. विखुरलेल्या या समाजाने एकजूट झाल्यास समस्या सुटू शकतील. त्यामुळे कुणबी समाजाने एकजूट व्हावे, असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर येथे तालुका कुणबी समाज संघटना चामोर्शी तसेच कुणबी समाज संघटना किष्टापूर यांच्या वतीने २८ जानेवारी रोजी भव्य समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
गटागटात विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्रित आणण्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील युवक, युवती, समाजबांधवांमध्ये शिक्षण, नोकरीतील आरक्षण, शिष्यवृत्ती, मंडल आयोग, शिक्षण पध्दती, शेतकºयांचे प्रश्न, शेतमालाला भाव, बेरोजगारी आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
किष्टापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित समाज प्रबोधन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी महाविद्यालय येणापूरचे माजी प्राचार्य जयंत येलमुले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिध्द वक्ते प्रा. दिलीप चौधरी, व्याख्याता राजश्री नितेश गोहणे, प्रमुख अतिथी म्हणून तालुका कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष बाळू दहेलकर, पंचायत समिती सदस्या वंदना गौरकार, कुणबी समाज संघटना किष्टापूरचे अध्यक्ष सिताराम पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ निखाडे, सोमनपल्ली ग्रा.पं.चे सरपंच आनंद पिदुरकर, बाबुराव बकाले उपस्थित होते.
समाज प्रबोधन मेळाव्याला चामोर्शी तालुक्यातील कुणबी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी सहकार्य केले.
ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शन
समाज प्रबोधन मेळाव्यात कुणबी समाजातील विविध प्रश्न, तसेच मागील दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती, नॉन क्रिमीलेअर रद्द करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहाची निर्मिती करणे तसेच विद्यार्थ्यांच्या अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ओबीसी शेतकºयांना योजनांचा लाभ देणे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करणे, शेतकरी हिताच्या विविध योजना राबवून त्याचा लाभ देणे यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.