कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:48 AM2023-10-05T10:48:23+5:302023-10-05T10:50:57+5:30
तयारी जाेमात : आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटणार समाजबांधव
गडचिरोली : राज्यात मराठा समाजाच्या वतीने कुणबी प्रमाणपत्र मुख्यालयात सभा देण्याची मागणी होत आहे. ही मागणी कुणबी समाजासह ओबीसींवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे राज्यातील कुणबी समाजासह ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा विरोध दर्शवीत आहेत. याच मागणीला घेऊन जिल्ह्यात कुणबी समाजाच्या वतीने ५ ऑक्टोबर राेजी गुरुवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील कुणबी समाजबांधव एकवटत असून, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सभांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे सदर माेर्चाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यासह व लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातून १५ हजारांवर समाजबांधव या माेर्चात सहभागी हाेणार आहेत.
शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. शासनाने ओबीसींवर सातत्याने अन्याय करीत असल्याने शासनाप्रति रोष व्यक्त केला आहे. कुणबी समाज समिती जिल्हा गडचिराेलीच्या बॅनरखाली सर्वपक्षीय कुणबी समाजबांधवांनी गावागावांत सभा आयाेजित करून सदर माेर्चा यशस्वी करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून सभा घेतल्या. प्रत्येक तालुकास्तरावर, माेठ्या गावात, तसेच ज्या गावात कुणबी समाजाची संख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये खास करून सभा घेण्यात आल्या. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी, सायंकाळी या सभा पार पडल्या. शहरी भागात तर रात्रीसुद्धा समाजाच्या बैठका पार पडल्या.
शहरात पोस्टर, सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा
'मी कुणबी, कुणबी एकता जिंदाबाद, कुणबी असाल तर मोर्चात दिसाल' असा मजकूर असलेले बॅनर शहरात दर्शनी भागावर झळकत आहेत. याशिवाय या मोर्चाच्या संदर्भा आणखी शेकडो बॅनर चारही प्रमुख मार्गावर तसेच वाहनांवर आणि इंदिरा गांधी चौकात झळकत आहेत. सर्वपक्ष नेत्यांचा मोर्चाला पाठिंबा आहे.
अशी आहे वाहन पार्किंग व्यवस्था
सदर माेर्चाला हजाराे समाजबांधव चारचाकी, तसेच दुचाकी वाहनाने सकाळी १० वाजतापासून गडचिराेली शहरात दाखल हाेणार आहेत. त्यामुळे गुरुवारला माेर्चेकऱ्यांच्या वाहनाने रस्ते फुलणार आहेत. दरम्यान, समाजसंघटनेच्या वतीने वाहन पार्किंग व्यवस्था वेगवेगळया चार ठिकाणी करण्यात आली आहे. धानाेरा मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी जिल्हा स्टेडियम, चांदाळा व पाेटेगाव राेडवरील खुल्या जागेत वाहन पार्किंग व्यवस्था राहणार आहे. चंद्रपूर मार्गावरून येणारी वाहने याच मार्गावरील अभिनव लाॅनवर ठेवण्यात येणार आहेत. धानाेरा मार्गावरील वाहने याच मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळील खुल्या जागेत, तर चामाेर्शी मार्गावरील वाहने वीर बाबूराव शेडमाके चाैकासमाेरील खुल्या जागेत उभी करण्यात येणार आहेत.
या संघटनांचा जाहीर पाठिंबा
कुणबी महामाेर्चाला जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, तसेच शैक्षणिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, बीआरएस, कलार समाज संघटना, तेली समाज संघटना, वंचित बहुजन आघाडी, माळी समाज संघटना गडचिरोली, जस्टिस फाॅर मुव्हमेंट, धाेबी समाज संघटना आदींचा समावेश आहे. याशिवाय विविध राजकीय पक्षांनीही या माेर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.
तगडा पाेलिस बंदाेबस्त
सदर महामाेर्चादरम्यान काेणतीही अनुचित घटना घडणार नाही, सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी गडचिराेली पाेलिस ठाण्याच्या वतीने धानाेरा मार्ग, इंदिरा गांधी चाैक, चंद्रपूर मार्ग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तगडा पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे.