प्लास्टिक बॉटलने बांधणार कुरमा घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:00 AM2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:04+5:30
आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वत:च्या घरी न ठेवता कुरमा घरात ठेवले जाते. सदर खोली कच्च्या स्वरूपाची राहते. त्यामुळे पावसाळ्यात या कुरमाघरात विंचू, साप व इतर कीटक शिरण्याचा धोका राहतो. कायमस्वरूपी भिंत बांधल्यास हा धोका कमी होईल, ही बाब लक्षात घेऊन मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटलपासून सदर भिंत तयार करण्याचा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : सोशल वेल्फेअर असोसिएशन मुंबई व जी.सी.पाटील मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो तथा पर्यावरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ९ हजार ५०० टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सपासून तुकूम येथे कुरमाघराची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे.
आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वत:च्या घरी न ठेवता कुरमा घरात ठेवले जाते. सदर खोली कच्च्या स्वरूपाची राहते. त्यामुळे पावसाळ्यात या कुरमाघरात विंचू, साप व इतर कीटक शिरण्याचा धोका राहतो. कायमस्वरूपी भिंत बांधल्यास हा धोका कमी होईल, ही बाब लक्षात घेऊन मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटलपासून सदर भिंत तयार करण्याचा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.
प्लास्टिकच्या बॉटल पर्यावरणाला अत्यंत घातक राहतात. तरीही त्या अस्ताव्यस्त फेकल्या जातात. रासेयो व पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी फेकल्या गेलेल्या ९ हजार ५०० बॉटल गोळा केल्या. या बॉटलमध्ये माती भरली. सदर बॉटलवर सिमेंटचा मसाला टाकून भिंत तयार केली आहे. बॉटलच्या झाकणांना आकर्षक रंग देण्यात आले आहे. या भिंतीला बाहेरच्या बाजूने प्लास्टर केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे पाणी खोलीत येणार नाही. कुरमा घरासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम करण्याचा प्रयत्न शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
या उपक्रमासाठी प्रकल्पाचे संयोजक अभियंता प्रशांत मद्मवार, तालुका समन्वयक अमोल ठाकरे, समुदाय संघटक गणेश गुड्डी यांच्यासोबतच सरपंच अमोल गेडाम, प्राचार्य राजू किरमिरे, डॉ.गणेश चुधरी, प्रा.पंढरी वाघ, प्रा.ज्ञानेश बन्सोड, डॉ.सोनाली ढवस, प्रा.डी.व्ही.झाडे, प्रा.एम.तोंडरे, प्रा.एन.पुण्याप्रेड्डीवार, प्रा.पी.वाळके हे सहकार्य व मार्गदर्शन करीत आहेत.