कुरखेडा, आलापल्लीत दोन लाखांवर दारू व सडवा जप्त
By admin | Published: May 15, 2016 01:02 AM2016-05-15T01:02:14+5:302016-05-15T01:02:14+5:30
कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे.
देवसराड नाल्यावर सडवा सापडला : आलापल्लीत पाच आरोपींवर गुन्हा दाखल, तिघे फरार
कुरखेडा/आलापल्ली : कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी सुधीर कटारे यांच्या चमूने १४ मे रोजी येथे धाड घालून हा मोहफूल सडवा जप्त केला. धाडीदरम्यान घटनास्थळावर कुणीही इसम आढळून आला नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
तर अहेरी तालुक्याच्या आलापल्ली येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष दारूबंदी पथकाने शुक्रवारी धाड घालून १ लाख ९६ हजार ८२० रूपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दारूविक्रेते आरोपी संतोष श्रीधर अग्रवाल (२७) रा. आलापल्ली, नितेश सुधाकर येमुलवार (३०) रा. गणेशनगर मुलचेरा या दोघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील गणेश सीताराम मडावी, रेखा गणेश मडावी दोघेही रा. आलापल्ली व कृष्णा मुजुमदार रा. कसनसूर हे तीन आरोपी फरार झाले आहेत. यांच्याकडून पोलिसांनी इन्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या १८० एमएल मापाच्या १८६ निपा जप्त केल्या. याची किंमत १ लाख २१ हजार ५०० रूपये आहे. ४६ हजार २०० रूपये किंमतीच्या गोवा कंपनीच्या १८० एमएल मापाच्या ४६२ व १४ हजार ४०० रूपये किंमतीच्या बीआर हायवार्ड कंपनीच्या ७२ निपा जप्त केल्या. याशिवाय पोलिसांनी दारूविक्रेत्याच्या घरून दारूविक्रीतून जमा झालेली १४ हजार ७२० रूपयांची रोकड जप्त केली. या आरोपींविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आलापल्लीजवळच्या दामापूर येथेही पथकाने कारवाई करून ४० हजारांची दारू पकडली. (प्रतिनिधी)