कुरखेडा, भामरागडात पूर

By admin | Published: September 12, 2016 01:59 AM2016-09-12T01:59:05+5:302016-09-12T01:59:05+5:30

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कुरखेडा नजीकच्या सती नदीला पूर आला

Kurkheda, Bhimragad flood | कुरखेडा, भामरागडात पूर

कुरखेडा, भामरागडात पूर

Next

५० घरांना पुराचा वेढा : कुरखेडा-कोरची-मालेवाडा-कढोली, आलापल्ली-भामरागड मार्ग बंद
कुरखेडा/भामरागड : गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कुरखेडा नजीकच्या सती नदीला पूर आला असून सती नदीच्या पुलावर तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे कुरखेडा-कोरची-मालेवाडा व कढोली मार्गावरील वाहतूक तब्बल पाच तास ठप्प होती. सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सती नदीच्या पुलावर पाणी होते. ५ वाजतानंतर पुलावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली व जनजीवन पूर्वपदावर आले. कुरखेडा शहरातील वार्ड क्रमांक १५ मध्ये पुराचे पाणी शिरल्याने ५० घरांना पुराने वेढा दिला आहे. भामराड तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्याने पर्लकोटा नदीवर पूर आला. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत या पुलावर पाणी असल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद होता.
रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ७४ मिमी पाऊस बरसला. धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुरखेडानजीकच्या सती नदीला पूर आल्यामुळे वार्ड क्रमांक १५ मधील ५० घरांमध्ये पाणी शिरले. महसूल विभागाने या सर्व पूर पीडित कुटुंबांना येथील ग्रामीण विकास विद्यालयात सुरक्षितस्थळी हलविले. तसेच महसूल विभागातर्फे या पूर पीडित कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. आमदार क्रिष्णा गजबे यांनी रविवारी कुरखेडा येथे जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राम लांजेवार, स्वाती नंदनवार, नंदिनी दखणे, दिपाली देशमुख, जलालभाई सय्यद, उल्हास देशमुख आदी उपस्थित होते. आमदार गजबे यांनी ग्रामीण विकास विद्यालयात जाऊन पूर पीडितांची भेट घेतली. यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कुरखेडाचे नायब तहसीलदार सुधाकर मडावी, महेश चुनारकर, अल्पेश बारापात्रे, कमलेश कुमरे यांची चमू पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सती नदीच्या पुलावर चार ते पाच फूट पाणी चढल्याने ४ वाजेपर्यंत कुरखेडा-कोरची-मालेवाडा-कढोली मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प होती. ५ वाजतानंतर पुलावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक दुपारी १२ वाजतापर्यंत बंद होती. मात्र त्यानंतर पुलावरील पाणी कमी झाल्याने बस व खासगी वाहतूक सुरू झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

शेतीपयोगी अवजारे व विद्युत मोटारी वाहून गेल्या
कुरखेडा तालुक्यातील सती नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला. नदी शेजारी असलेल्या शेतातील अवजारे व विद्युत मोटारी पूरात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील खेडेगाव, मालेवाडा या गावांना पुरामुळे बेटाचे स्वरूप आले होते. गेल्या तीन वर्षात सती नदीला आलेला आजचा पूर हा सर्वात मोठा पूर ठरला. सती नदीच्या पुरामुळे मार्गावर दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मानापूर-धानोरा-कुरखेडा मार्ग बंद
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वैलोचना नदीला पूर आला. नदीच्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने वैरागड-कुरखेडा-कढोली, वैरागड-रांगी-धानोरा तसेच मानापूर-धानोरा-कुरखेडा मार्ग बंद झाला. या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. करपडा घाटावरील खोब्रागडी नदीच्या पूलावर या पावसाळ्यात पाणी नव्हता. मात्र रविवारी झालेल्या पावसाने वैरागड-रांगी मार्ग दिवसभर बंद होता. पुरामुळे वैरागड परिसरासह कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव, पलसगड, चारभट्टी परिसरातील शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे मालेवाडा, कढोली, रामगडचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला.

२२ तासापासून कोरचीतील वीज पुरवठा खंडीत
शनिवारी झालेल्या मुसळधार कोरची तालुक्यातीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरची तालुक्यात गेल्या २४ तासात ११९.२ मिमी पाऊस झाला आहे. पावसामुळे कोरचीनजीक वीज खांब वाकले. तसेच काही ठिकाणी ताराही वाकल्या. त्यामुळे कोरची शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला. मागील २२ तासांपासून कोरची शहरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. पावसामुळे शेत व सखल भागात सर्वत्र पाणी साचले आहे.

कुरखेडा तालुक्यात २९ घरांची पडझड
कुरखेडानजीकच्या सती नदीला पूर आला असून कुरखेडा तालुक्यात ११९.३ मिमी पाऊस गेल्या २४ तासात बरसला. यामुळे कुरखेडा तालुक्याच्या कढोली परिसरातील १५ व कुरखेडा परिसरातील १४ अशा एकूण २९ घरांची अशंता पडझड झाली. याशिवाय लक्ष्मीपूर येथील एका शेतकऱ्याचा गोठा पडल्याने एक वासरू दगावल्याची माहिती आहे. पूर परिस्थितीमुळे कुरखेडा परिसरातील गावांना नुकसान पोहोचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: Kurkheda, Bhimragad flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.