कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:49 PM2019-05-05T23:49:15+5:302019-05-05T23:50:14+5:30
कुरखेडा-कोरची मार्गावरील जांभुळखेडा गावाजवळील नाल्यावर नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची डागडुजी केली नव्हती. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा-कोरची मार्गावरील जांभुळखेडा गावाजवळील नाल्यावर नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची डागडुजी केली नव्हती. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी ४ मे रोजी प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. पुलाचे काही प्रमाणात डागडुजी केल्याने मार्ग पुन्हा सुरू झाला आहे.
ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाला, त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. तसेच पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने खड्ड्यामध्ये माती टाकून सदर खड्डा बुजविला आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहने, ट्रॅक्टर, कमी वजनाचे ट्रक यांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पक्की दुरूस्ती आवश्यक
बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली आहे. या ठिकाणी माती व सिमेंट काँक्रीट टाकून खड्डा बुजविला आहे. मात्र पाऊस पडल्यानंतर माती खोलात जाऊन पुन्हा खड्ड्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच स्फोटामुळे पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. या ठिकाणावरून छत्तीसगड राज्यातून येणारे मोठमोठे ट्रक व ट्रेलर यांची वाहतूक राहते. त्यामुळे पुलाची कायमस्वरूपी दुरूस्ती होणे आवश्यक आहे.