कुरूड जि.प. हायस्कूलच्या इमारतीसाठी १८.८६ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:47+5:302021-03-20T04:35:47+5:30
कुरूड येथील शाळेत वर्गखाेल्यांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना बसण्यास अडचण येत हाेती. येथे वाढीव वर्गखाेल्या मंजूर कराव्या ह्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन ...
कुरूड येथील शाळेत वर्गखाेल्यांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना बसण्यास अडचण येत हाेती. येथे वाढीव वर्गखाेल्या मंजूर कराव्या ह्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने २ मार्च रोजी आंदोलनाचा इशारा दिला हाेता. परंतु तालुका प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने आंदाेलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर आता शाळा इमारतीचे नूतनीकरण करण्याकरिता १८.८६ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास गोटेफोडे यांनी दिली. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये वर्ग खोल्यांचा अभाव असल्याने सहा खोल्यांमध्ये १२ वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०१७-१८ मध्ये शाळेसाठी इमारतीचे नूतनीकरण बांधकाम मंजूर करण्यात आले. कार्यारंभ आदेश २०१९ मध्ये मिळाला होता. कंत्राटदारामार्फत बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र बांधकामावरील उर्वरित रक्कम शासन स्तरावरून मिळतच नसल्याने साहित्य खरेदी वा इतर खर्च कुठून करावा? असा प्रश्न कंत्राटदाराला पडला व शेवटी शाळेच्या नूतनीकरणाचे बांधकाम बंद करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून बांधकाम बंद असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण येत आहे. शासनाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु काहीच उपयाेग झाला नाही. अखेर शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कार्यकारी अभियंता भरडकर यांनी लवकर निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार शाळेच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवलाजी राऊत, विलास गोटेफोडे यांनी दिली.